लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. शुक्रवारी या संदर्भात नागपूर येथे ऊर्जामंत्र्यासमवेत बैठक पार पडली असून हा प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती मिळाली आहे.राज्य शासनाने ग्रीन एनर्जी क्लीन एनर्जी हे धोरण अवलंबिले असून या अंतर्गत सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी निम्न दुधना प्रकल्पाच्या क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा आग्रह धरला होता. यातूनच १३ जुलै रोजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत नागपूर येथे बैठक पार पडली. या बैठकीत निम्न दुधना प्रकल्पाच्या मुख्य भिंतीवर, कालव्यावर किंवा धरणाच्या साठलेल्या पाण्यावर तरंगणारे सौर पॅनल उभारले जाऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले. या सर्व शक्यतांची तपासणी करण्यासाठी सर्र्वेक्षण करण्याचे आदेश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी महानिर्मिती व वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना दिले आहेत. या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी हे पथक लवकरच प्रकल्प क्षेत्रात दाखल होणार आहे. परभणी व जालना जिल्हाधिकाºयांशी चर्चा करुन आणखी शासकीय जमीन उपलब्ध होते का, याची शक्यता तपासली जाणार आहे. त्यानंतर संयुक्त पाहणी अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती मिळाली. निम्न दुधना प्रकल्पाच्या क्षेत्रात २५० हेक्टर जागा उपलब्ध होऊ शकते. या ठिकाणी ५० मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारला जाऊ शकतो, असे निम्न दुधना प्रकल्पाच्या अभियंत्यांनी या बैठकीत असल्याची माहिती भाजपाचे तालुका सरचिटणीस पंकज निकम यांनी दिली.निम्न दुधना प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने लवकरच सर्वेक्षण होणार आहे. या पार्श्वभूमीवर जालना आणि परभणी जिल्हाधिकाºयांसमवेत बैठक घेतली जाणार असून, त्यानंतरच सर्वेक्षणाची तारीख निश्चित होईल.
परभणी : निम्न दुधना प्रकल्पावर सौर ऊर्जा प्रकल्पासाठी हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:26 AM