परभणी : परभणी ते मुदखेड या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आॅक्टोबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार असून, याच महिन्यात या मार्गाचे लोकार्पण केले जाईल, अशी घोषणा नांदेड येथील रेल्वेचे अतिरिक्त प्रबंधक के़ नागभूषण राव यांनी केली असल्याची माहिती मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने दिली़
मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने नांदेड येथील नवनियुक्त अतिरिक्त प्रबंधक के़ नागभूषण राव यांचे १६ आॅगस्ट रोजी स्वागत करण्यात आले़ या प्रसंगी बोलताना राव यांनी वरील प्रमाणे घोषणा केली़ मनमाड-मुदखेड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे कामही लवकरच सुरू केले जाईल, त्याच प्रमाणे नांदेड-औरंगाबाद डेमो लोकल सुरू करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली़ त्याच प्रमाणे नांदेड-दौंड सवारी गाडी एक एसी कोच लावण्याचे प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले़ दक्षिण-मध्य रेल्वे विभागातील काही अधिकारी नांदेड-पुणे-पनवेल ही एक्सप्रेस रेल्वे रद्द करण्याचा घाट घालत आहेत़ या मार्गावर दररोज ४ ते ५ गाड्यांची आवश्यकता असताना सुरू असलेली एकमेव गाडीही रद्द केली जात आहे़ हा प्रकार थांबविला नाही तर महासंघ आंदोलन छेडेल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.