लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेच्या २०१८-१९ च्या १९० कोटी रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्पास शनिवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी देण्यात आली. महापालिकेला २०१८-१९ मध्ये ५९१ कोटी ४ लाख ४ हजार ५६७ रुपये एकूण जमा होणार असून त्यापैकी ४०० कोटी ९५ लाख २३ हजार रुपयांच्या खर्चाचे नियोजन या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे.येथील बी.रघुनाथ सभागृहात ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी आयुक्त राहुल रेखावार, उपमहापौर सय्यद समी ऊर्फ माजूलाला, प्रभारी नगरसचिव विकास रत्नपारखे यांची उपस्थिती होती. या सभेत २०१८-१९ चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आले. मुख्य लेखाधिकारी गणेश जाधव यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. आयुक्त राहुल रेखावार यांनी अर्थसंकल्पातील मुद्देनिहाय माहिती दिली. या अर्थसंकल्पावर सभागृह नेते भगवान वाघमारे, विरोधी पक्षनेते विजय जामकर, गटनेते जलालोद्दीन काजी, एस.एम. अली पाशा, जान महमद जानू, स्थायी समितीचे सभापती गणेश देशमुख, सुनील देशमुख, सचिन देशमुख यांनी या चर्चेत भाग घेत बजेटमध्ये तरतूद वाढविण्याची सूचना केली. अॅड.विष्णू नवले, अशोक डहाळे, नागेश सोनपसारे, इम्रानलाला, बाळासाहेब बुलबुले, लियाकत अन्सारी आदींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा घेण्याची मागणी केली. तर नगरसेवक सुशील कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा आयोजित कराव्यात, अशी मागणी केली. त्यावर यासाठी १० लाख रुपये तरतूद करण्याचेही निश्चित करण्यात आले. या स्पर्धांसाठी पाच जणांची समिती नेमण्याची घोषणा महापौर मीनाताई वरपूडकर यांनी केली. अर्थसंकल्पातील बजेटमध्ये नवीन हेडसाठी तरतूद करावी, तसेच हज हाऊस, वारकरी निवासासाठी जागा निश्चित करावी, असे गटनेते भगवान वाघमारे यांनी सांगितले. तर विपश्यना केंद्रासाठीही आर्थिक तरतूद करण्याची मागणी नागेश सोनपसारे यांनी केली. त्यावर तरतूद करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. जलतरणिका दुरुस्ती व क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठीही बजेटमध्ये तरतूद करण्यात आली.२०१७-१८ चे सुधारित व २०१८-१९ चे जमा खर्चाचे अंदाजपत्रक सुरुवातीच्या शिल्लकेसह सादर करण्यात आले. मागील वर्षीच्या अंदाजपत्रकातील एकूण जमा २९२ कोटी ६५ लाख व एकूण खर्च २९२ कोटी ४३ लाख रुपये असून २२ लाख ६ हजार रुपयांच्या शिल्लकेचे अंदाजपत्रक सादर केले होते.२०१८-१९ च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा १४२ कोटी ३ लाख रुपये होणार असून भांडवली जमा २१९ कोटी ४० लाख रुपये प्राप्त होणार आहेत. सुरुवातीची शिल्लक ११० कोटी ८३ लाख असून अशी एकत्रित ५९१ कोटी १० लाख रुपयांची वार्षिक जमा आहे.२०१८-१९ मध्ये महसूली खर्च ९९ कोटी ९१ लाख, प्रस्तावित अंदाजासह भांडवली खर्च २८१ कोटी ३७ लाख करण्याचे प्रस्तावित केले आहे. भांडवली योजनांवर जमापेक्षा अधिक खर्च तसेच विविध योजनांच्या सुरुवातीच्या अधिक खर्च हा विविध योजनांच्या सुरुवातीच्या शिल्लक निधीतून करण्याचे प्रस्तावित आहे. असा ४०० कोटी ९५ लाख रुपयांचा एकूण खर्च असून १९० कोटी ८ लाख रुपये शिल्लक राहणार आहे. या अर्थसंकल्पास सभागृहात मंजुरी देण्यात आली. हा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी उपायुक्त जगदीश मानमोटे, लेखा विभागाचे सहाय्यक लेखापाल भगवान यादव, मन्सूर अहमद, किरण देशमुख आदींनी प्रयत्न केले.‘नटराज’च्या नूतनीकरणासाठी कर्जपरभणी शहरातील नटराज रंगमंदिर मागील अनेक वर्षापासून बंद अवस्थेत आहे. शहरातील सांस्कृतिक चळवळ वाढविण्यासाठी नटराज रंगमंदिरची दुरुस्ती करण्याचा ठरावही या चर्चेला आला. नगरसेवक अॅड.विष्णू नवले यांनी दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर या अंदाजपत्रकात दुरुस्तीसाठी तरतूद नसली तरी नटराज रंगमंदिरच्या दुरुस्तीसाठी कर्ज घेण्याचे मात्र निश्चित करण्यात आले.प्रस्ताव शासनास पाठविणारमहानगरपालिकेच्या प्रारुप अंदाजपत्रकामध्ये वारकरी निवास आणि हज हाऊससाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सर्वसाधारण सभेत या मुद्यांवर चर्चा झाली. तरतूद वाढविण्याची मागणी काह नगरसेवकांनी केली. चर्चेनंतर परभणी शहरात वारकरी निवास, हज हाऊस आणि विपश्यना केंद्र उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
परभणी महापालिका: १९० कोटींचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 12:32 AM