परभणी महानगरपालिका : काँग्रेसकडे ५, राष्ट्रवादीकडे ४ सभापती पदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:07 AM2018-06-20T00:07:13+5:302018-06-20T00:07:13+5:30

महानगरपालिकेतील ७ विषय समित्या आणि ३ प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ५ तर राष्ट्रवादी काँग्रेसने ४ सभापती पदांवर बिनविरोध वर्चस्व मिळविले़ तर वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीचे सभापतीपद रिक्त राहिले आहे़

Parbhani Municipal Corporation: Congress has five, NCP has 4 chairmen | परभणी महानगरपालिका : काँग्रेसकडे ५, राष्ट्रवादीकडे ४ सभापती पदे

परभणी महानगरपालिका : काँग्रेसकडे ५, राष्ट्रवादीकडे ४ सभापती पदे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महानगरपालिकेतील ७ विषय समित्या आणि ३ प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ५ तर राष्ट्रवादी काँग्रेसने ४ सभापती पदांवर बिनविरोध वर्चस्व मिळविले़ तर वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीचे सभापतीपद रिक्त राहिले आहे़
सात विषय समित्या आणि तीन प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी मागील आठवड्यामध्ये विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता़ त्यानुसार १८ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत १० पैकी ८ जागांसाठी प्रत्येकी १ अर्ज आल्याने ही पदे बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झाले होते़ तसेच उर्वरित जागांवरही तडजोड होऊन सर्वच्या सर्व सभापतीपदे बिनविरोध होतील, अशी शक्यता वर्तविली जात होती़
येथील बी़ रघुनाथ सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांच्या अध्यक्षतेखाली १९ जून रोजी सकाळी १० वाजता निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला़ ८ सभापतीपदांसाठी प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने या पदांविषयी फारशी उत्सुकता नव्हती; परंतु, विधी समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचेच अमोल पाथरीकर आणि अ‍ॅड़ विष्णू नवले या दोघांचे अर्ज आल्याने या समितीच्या निवडीकडे लक्ष लागले होते़ मात्र निवडणूक निर्णय अधिकारी पृथ्वीराज यांनी विष्णू नवले यांचा अर्ज बाद ठरविला़ महानगरपालिका प्रशासनाच्या निवडणूक नियमानुसार स्वीकृत सदस्यांना कुठल्याही पदाची निवडणूक लढविता येत नसल्याचे स्पष्ट करीत नवले यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला़ त्यामुळे विधी समितीसाठीही अमोल पाथरीकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले़ तर प्रभाग समिती क साठी भाजपाच्या उषा झांबड आणि काँगे्रसचे महेमुद खान मजिद खान असे दोन अर्ज आल्याने या पदासाठी निवडणूक होईल, अशी चिन्हे होती़ परंतु, उषा झांबड यांनी अर्ज मागे घेतला़ त्यामुळे काँग्रेसचे महेमुद खान मजिद खान यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली़ विषय समित्यांच्या ७ व प्रभाग समित्यांच्या ३ सभापती पदांपैकी काँग्रेसकडे महिला व बालकल्याण, माध्यमिक, पूर्व माध्यमिक व तांत्रिक समिती, समाजकल्याण समिती आणि प्रभाग समिती ब व प्रभाग समिती क ची दोन सभापतीपदे अशी ५ सभापतीपदे राहिली आहेत़ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात शहर सुधार, स्थापत्य, विधी या विषय समित्यांबरोबरच प्रभाग समिती अ चे सभापतीपद मिळाल्याने राष्ट्रवादीचे ४ सभापती झाले आहेत़ तर आरोग्य समितीचे सभापतीपद मात्र रिक्त राहिले आहे़ या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाला एकही पद मिळाले नाही़
हम सब साथ साथ है़़़
महानगरपालिकेतील १० पैकी ९ विषय समिती सभापतींच्या मंगळवारी बिनविरोध निवडी झाल्या़ त्यामध्ये ५ समित्या काँग्रेसकडे तर ४ समित्या राष्ट्रवादीकडे आल्या़ विशेष म्हणजे महानगरपालिकेत काँग्रेस पक्ष सत्ताधारी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात आहे़ तरीही या दोन्ही पक्षांनी एकत्र येत सभापतींच्या निवडी बिनविरोध केल्या़ विशेष म्हणजे त्यांना शिवसेना आणि भाजपाचीही पुरेपूर साथ मिळाली़ या दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी एका सदस्याने सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला होता़ परंतु, त्याने तो नंतर परत घेतला़ संख्याबळाच्या आधारावर निवडणूक जरी झाली असती तरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचेच सभापती निवडून येऊ शकले असते़ परंतु, प्रातिनिधीक स्वरुपात देखील शिवसेना किंवा भाजपा यामधील एकाही पक्षाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या विरोधात निवडणूक लढविण्याची भूमिका घेतलेली नाही़ त्यामुळे महानगरपालिकेत मंगळवारी तरी ‘हम सब एक साथ है’ याचाच प्रत्यय विविध पक्षांनी आणून दिला़ त्यामुळे या पुढील काळातही महानगरपालिकेत सामंजस्याचे व एकमेकांना सहाय्य करण्याचे राजकारण दिसून येईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसून येत आहे़ परिणामी महानगरपालिकेत विरोधी पक्षच अस्तित्वात असणार आहे की नाही या विषयी देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे़
निवडीनंतर जल्लोष
या निवडणुकीसाठी महापालिकेचे उपायुक्त विद्याताई गायकवाड, नगरसचिव विकास रत्नपारखे, मुकूंद कुलकर्णी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सहकार्य केले़ बिनविरोध निवडी जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांचे फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले़
शिवसेनेने घेतली माघार
विषय समित्यांच्या निवडीमध्ये शिवसेनेला एक सभापतीपद मिळाले होते़ वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेचे नगरसेवक प्रशास ठाकूर यांनी एकमेव अर्ज दाखल केल्याने ७ पैकी शिवसेनेचा एक सभापती होईल, असे जवळपास निश्चित होते़
परंतु, ऐनवेळी निर्णय बदलण्यात आला आणि प्रशास ठाकूर यांनी दाखल केलेला अर्ज मागे घेतला़ त्यामुळे आरोग्य समितीचे सभापतीपद रिक्त राहिले आहे़

Web Title: Parbhani Municipal Corporation: Congress has five, NCP has 4 chairmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.