परभणी : मालमत्ता कर वसुलीच्या प्रमाणात वाढ व्हावी यासाठी मालमत्ता कर थकबाकीवरील, कर विलंब शास्तीत १०० टक्के सूट अभय योजना लागू केली आहे. मनपाच्या या निर्णयामुळे मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा मिळणार आहे. हे आदेश आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी काढले आहेत.
सदर अभय योजना १५ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभय योजनेचा लाभ हा केवळ थकीत व चालू आर्थिक वर्षापर्यंतचा मालमत्ता कर एकरकमी भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना अनुज्ञेय आहे. २८ फेब्रुवारीनंतर सदर सूट लागू राहणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आपल्याकडील थकीत मालमत्ता कर व चालू वर्षापर्यंतचा मालमत्ता कर एकरकमी भरणा करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक तृप्ती सांडभोर यांनी केले आहे.