लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असून, नवीन आर्थिक स्त्रोत निर्माण होत नसल्याने कर्जाचा बोजा वाढत चालला आहे़ सद्यस्थितीत महानगरपालिकेवर ७८ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्ज असून, ही कर्जफेड करून विकास कामे राबविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे़महानगरपालिकेचा २०२०-२१ या वर्षाचा आर्थिक ताळेबंद शनिवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला़ महसूली उत्पन्न, भांडवली उत्पन्न आणि पुढील वर्षात होणारा खर्च याचा ताळेबंद लावत ५७६ कोटी रुपयांचा शिलकी आराखडा महानगरपालिकेने सादर केला़ या आराखड्यातील तरतुदी लक्षात घेता मनपाला मोठ्या प्रमाणात कर्ज देणी असल्याचेही समोर आले आहे़ त्यामुळे कृती आराखडा तयार करीत असताना कर्ज परतफेड करण्याचे नियोजनही प्रशासनाला करावे लागत आहे़ सद्यस्थितीला महानगरपालिकेच्या डोक्यावर ७६ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्ज असून, या कर्जाची परतफेड करून उर्वरित पैसा शहर विकासावर खर्च करावा लागणार आहे़ मात्र मनपाकडे घरपट्टी, नळपट्टी व इतर कर वगळता उत्पन्नाचे ठोस साधन उपलब्ध नाही़ त्यामुळे मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी कराव्यतिरिक्त नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर द्यावा लागणार आहे़ महापालिकेकडे असलेले कर्ज हे शहरातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरील कर्ज आहे, ही बाब लक्षात घेवून या कर्जातून मुक्तता मिळविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावे लागणार आहेत़ मुलभूत सुविधा वगळता इतर विकास कामे करताना कर्जाचा अडथळा ठरत आहे़ त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी महानगरपालिकेला उपाययोजना कराव्या लागणार आहेत़१५० कोटींचे महसुली उत्पन्न४मनपाला २०१९-२० या वर्षात करांच्या माध्यमातून १५० कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न प्राप्त झाले आहे़ त्यात स्थानिक संस्था करातून १० कोटी, मालमत्ता करातून ३९ कोटी, हस्तांतरण फी ३ कोटी, जाहिरात कर २५ लाख, वृक्ष कर २ कोटी ६६ लाख, साफसफाई कर ५ कोटी ३२ लाख, टॉवर कर १२ कोटी ७९ लाख आणि नगररचना विभागातून १ कोटी ५१ लाख रुपये महसुली उत्पन्न प्राप्त झाले आहे़४शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आल्याने २०१९-२० च्या तुलनेत ९ कोटी रुपयांनी वाढीव मालमत्ता कर जमा होईल, अशी आशा मनपाला आहे़ प्रत्यक्षात कर वगळता महापालिकेकडे उत्पन्नाचे दुसरे स्त्रोत उपलब्ध नाहीत़ त्यामुळे हे स्त्रोत वाढविण्यासाठी प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे़अशी आहे कर्जाची थकबाकी४परभणी मनपाने ३ कोटी ७२ लाख रुपये आयुर्विमा कर्ज घेतले आहे़ त्याचप्रमाणे १ कोटी ५ लाख रुपयांचे खुल्या बाजारातील कर्ज १ कोटी ८० लाख रुपयांचे हुडकोचे कर्ज, ५८ कोटी ७२ लाख रुपयांचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्ज, ८ कोटी ८० लाख रुपये पूर्णा पाटबंधारे, २ कोटी ७० लाख युडी-६, पथदिव्यांच्या वीज बिलापोटी २ कोटी अशी ७६ कोटी ७९ लाख रुपये कर्जाची थकबाकी आहे़ थकबाकीचा डोंगर वाढत चालल्याने विकासकामांवर परिणाम होत आहे.
परभणी मनपावर ७८ कोटींच्या कर्जाचा बोजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 10:27 PM