लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी काँग्रेसचे सुनील देशमुख यांची तर आरोग्य सभापती पदी सचिन देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी या संदर्भातील प्रक्रिया मनपाच्या बी.रघुनाथ सभागृहात सकाळी १० वाजता पार पडली.महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी काँग्रेसकडून सुनील देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसकडून इम्रान हुसेनी यांनी तर आरोग्य सभापतीपदासाठी काँग्रेसचे सचिन देशमुख व राष्ट्रवादीच्या डॉ.वर्षा खिल्लारे यांनी गुरुवारी प्रशासनाकडे अर्ज दाखल केले होते.शुक्रवारी सकाळी या संदर्भात पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया आयोजित केली होती.या अनुषंगाने उमेदवारी अर्ज घेण्यास शुक्रवारी सकाळी वेळ देण्यात आला. त्यामध्ये स्थायीसाठी दाखल केलेला अर्ज राष्ट्रवादीचे इम्रान हुसेनी यांनी तर आरोग्य सभापतीपदासाठी दाखल केलेला अर्ज डॉ.वर्षा खिल्लारे यांनी परत घेतला. त्यामुळे काँग्रेसचे सुनील देशमुख व सचिन देशमुख यांची बिनविरोध निवड झाल्याचे जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी जाहीर केले. त्यानंतर नवनिर्वाचित दोन्ही सभापतींचा जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला.यावेळी महापौर मीनाताई वरपूडकर, उपमहापौर माजूलाला, आयुक्त रमेश पवार, काँग्रेसचे गटनेते भगवान वाघमारे, विधी सभापती अमोल पाथरीकर, विरोधी पक्षनेते विजय जामकर, राष्ट्रवादीचे गटनेते जलालोद्दीन काजी, नगरसेवक गणेश देशमुख, गुलमीर खान, इम्रान हुसेनी, मोईन मोैली, स. महेबुब अली पाशा, विनोद कदम, विकास लंगोटे आदींची उपस्थिती होती.