लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दोन महिन्यांपासून येथील महानगरपालिकेचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे़ विकासाची कामे तर सोडाच; परंतु, नियमित स्वच्छतेची कामेही होत नसल्याने शहराला बकाल अवस्था प्राप्त झाली आहे़महानगरपालिकेचे आयुक्त राहुल रेखावार यांची एप्रिल महिन्यात बदली झाली़ त्यानंतर परभणी महानगरपालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाले नाहीत़ सध्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मनपाच्या आयुक्त पदाचा प्रभारी कार्यभार सोपविलेला आहे़ तत्कालीन आयुक्त राहुल रेखावार यांनी शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबविले होते़ कर्मचाºयांना शिस्त लावली होती़ कामांचे विकेंद्रीकरण करून प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयांना कामांची जबाबदारी निश्चित करून दिली होती़ त्यामुळे शहरात नियमित स्वच्छतेची कामे झाली़ मागील अनेक वर्षांपासून अस्वच्छ असलेले शहर ५ -६ महिन्यांपूर्वी स्वच्छतेच्या वाटेवर येत असल्याचे दिसू लागले़ शहरवासियांसाठी ही समाधानाची बाब ठरली; परंतु, हा बदल अल्पकाळाचा ठरला आहे़ आयुक्त राहुल रेखावार यांची बदली झाल्यानंतर महानगरपालिकेतील संपूर्ण कारभार ढेपाळला आहे़ अधिकारी आणि कर्मचाºयांवर नियंत्रण राहिले नसून, शहरातील स्वच्छतेची कामे ही ठप्प पडली आहेत़दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील मोठ्या नाल्यांची स्वच्छता केली जाते़ या स्वच्छतेमुळे पावसाळ्यात जमा होणारे पाणी शहराबाहेर काढून देणे सोयीचे होते़ यावर्षी पावसाळ्यापूर्वीच्या स्वच्छतेलाच फाटा देण्यात आला़ ओरड झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी स्वच्छतेचे टेंडर काढण्यात आले़ जेसीबी मशीनच्या सहाय्याने एक-दोन नाल्यांची जुजबी स्वच्छताही करण्यात आली; परंतु, प्रमुख मोठे नाले आणि वसाहतींमधील नाल्यांची स्वच्छता झालीच नाही़ डिग्गी नालाही पूर्वी प्रमाणेच गाळाने भरलेला आहे़ त्यामुळे चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शहराला बकाल अवस्था प्राप्त झाली आहे़ शहरात जागोजागी पाण्याचे डबके साचले असून, नाल्यांमधील कचरा रस्त्यावर आल्याने दुर्गंधी पसरली आहे़ स्वच्छतेच्या कामाचे कंत्राट काढले; परंतु, स्वच्छता झाली नाही़ त्यामुळे या कामांतून काय साध्य झाले, असा प्रश्न निर्माण होत आहे़ शहराच्या स्वच्छता आणि विकासाच्या कामांबरोबरच महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाजही विस्कळीत झाले आहे़ नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असून, विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिक महापालिकेच्या कार्यालयात चकरा मारतात; परंतु, अधिकारी, कर्मचारी जागेवर नसल्याने या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे़ अधिकारीच कार्यालयीन वेळेत त्यांच्या कक्षात थांबत नसल्याने कर्मचारीही उपलब्ध होत नाहीत़ नागरिकांची कामे खोळंबून गेली आहेत़ त्यामुळे तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ अधिकारी आणि कर्मचाºयांच्या कामकाजात विस्कळीतपणा आला आहे़ कोणाचे कोणावर नियंत्रण नसल्याचेच दिसत आहे़विरोधी पक्षही चिडीचूपशहरातील विकास कामांबरोबरच प्रशासकीय कामात विस्कळीतपणा आला असताना याविरूद्ध जाब विचारण्यासाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधी पुढे येत नाहीत़ शहरात स्वच्छतेची कामे होत नाहीत़ १० ते १५ दिवसांपर्यंत शहरवासियांना पाणी मिळत नाही़ अशा परिस्थितीत विरोधी पक्षातील सदस्यांनी आवाज उठविणे अपेक्षित असताना विरोधी नगरसेवकही चिडीचूप असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे़जिल्हाधिकाºयांचे झाले दुर्लक्षमहानगरपालिकेचा पदभार जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याकडे आल्यानंतर महापालिकेतील कारभारात आणखी सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती़ जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी कोल्हापूर येथे मनपा आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळल्याने या अनुभवाचा परभणी महापालिकेलाही फायदा होईल, अशी अपेक्षा होती; परंतु, प्रभारी पदाच्या दोन महिन्यांच्या कार्यकाळात महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात एकही ठोस धोरणात्मक निर्णय झाला नाही़ तसेच अधिकारी, कर्मचाºयांवरही जिल्हाधिकाºयांचे नियंत्रण राहिलेले नाही़दोन महिन्यांपूर्वी असलेली प्रशासकीय शिस्त आणि प्रशासकीय घडी सध्या पूर्णत: विस्कळीत झाली आहे़ जिल्हाधिकाºयांनीच याकडे लक्ष देऊन प्रशासकीय कारभारात सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे़घंटागाड्या बंद पडल्याशहराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाची भूमिका निभावणाºया घंटागाड्या सध्या बंद आहेत़ महापालिकेने कमी किंमतीचे कंत्राट मंजूर केल्याने घंटागाडी चालकांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे़ नवीन कंत्राटामुळे या चालकांना पूर्वीपेक्षा कमी पगारावर काम करावे लागणार आहे़ त्यामुळे घंटागाडी चालकांमध्ये नाराजी असून, मागील १५ दिवसांपासून शहरातील घंटागाड्या बंद झाल्या आहेत़ परिणामी वसाहतींमधील कचरा वाढत चालला आहे़
परभणी महानगरपालिकेचा कारभार ढेपाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:16 AM