लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): अत्यल्प पाऊस झाल्याने व निम्न दुधना प्रकल्पात जीवंत साठा कमी असल्याने आगामी जून महिन्यापर्यंत सेलू शहराला पाणी पुरेल या दृष्टीने सेलू पालिकेने पाणी कपातीचे पाऊल उचलले आहे. १५ डिसेंबरपासून पाण्याचा १५ मिनीट वेळ कमी करण्यात आला आहे.सेलू शहराला निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. दुधना प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्यानंतर सेलू पालिकेकडून मूबलक पाणी सोडल्या जाते; परंतु, दुुष्काळी परिस्थितीमुळे निम्न दुधना प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा असल्याने पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्यापूर्वीच सेलू पालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.शहरात जवळपास ४ हजार नळ जोडणी आहेत. दररोज शहराला ४ दलघमी पाणी लागते. पाण्याचे वितरण ७ झोनमधून होते. शहरातील विविध प्रभागाला दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. निम्न दुधना प्रकल्पातून परतूर, मंठा आठगाव पाणीपुरवठा योजना या शहरांनाही पाणीपुरवठा केला जातो. आगामी जूनपर्यंत प्रकल्पातील पाणी काटकसरीने वापरण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. दुधनेच्या पाण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शहरासाठी शिल्लक नसल्याने दुधनात असलेले पाणी जूनपर्यंत पुरविण्यासाठी पालिकेलाही कसरत करावी लागणार आहे. शहरात दोन दिवसाआड मूबलक पाणीपुरवठा केला जात असल्याने अनेक भागांमध्ये पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पाणीटंचाई लक्षात घेऊन नगरपालिकेने पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ५०० तोट्या आणि वॉल बसविण्याचे काम सुरू केले आहे.दुधनातील पाणीसाठ्याचा विचार करून शहराला पाणीटंचाई भासणार नाही. तसेच पाणी काटकसरीने वापरण्यासंंदर्भात येथील मोरया प्रतिष्ठानने शहरात जनजागृती मोहीम हाती घेतील आहे. सद्य स्थितीत निम्न दुधना प्रकल्पात जीवंत पाणीसाठा केवळ ६ टक्के आहे. आगामी काळात जालना आणि परभणी जिल्ह्यातील काही शहरांना दुधनेतून पाणी घेण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे लागणारे पाणी आणि उपलब्ध पाणी यामध्ये तफावत निर्माण झाली आहे. एप्रिल, मे महिन्यात दुधनेच्या मृत साठ्यातून देखील पाणी घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सेलू पालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.आणखी १५ मिनीटे पाणी कपात होण्याची शक्यता४शहरात काही भागात ४५ मिनिटे तर काही भागात एक तास पाणीपुरवठा दोन दिवसाआड केला जातो. नगरपालिकेने १५ डिसेंबरपासून सोडल्या जाणाऱ्या पाण्याची वेळ १५ मिनीटे कमी केली आहे. आगामी काळात पाणीटंचाई लक्षात घेऊन पालिका प्रशासन आणखी १५ मिनिटांचा कालावधी कमी करण्याची शक्यता आहे.४सेलू येथील नगर पालिकेने पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ५०० तोट्या व पाण्याची गळती रोखण्यासाठी काही वॉल बसविण्याचे काम हाती घेतले असल्याची माहिती न.प.चे मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी दिली.
परभणी : नगरपालिकेने उचलेले पाणी कपातीचे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 12:55 AM