लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): पुणे शहरातील बालेवाडी भागात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मानवत तालुक्यातील इटाळी शिवारात धारधार शस्त्राने खून केल्या प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पाच दिवसांपूर्वी बेवारस सापडलेल्या व्यक्तीच्या खून प्रकरणाचा यानिमित्ताने पोलिसांनी कसून तपास करुन उलगडा केला आहे.मानवत तालुक्यातील इटाळी शिवारातील कॅनॉलमध्ये २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका ५५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. मयत व्यक्तीच्या शरीरावर घाव आढळून आल्याने घातपातचा पोलिसांना संशय होता. विशेष म्हणजे सदरील व्यक्तीचा साधारणत: पाच दिवसांपूर्वी खून झाला असावा, असे चित्र पोलिसांना घटनास्थळावरील स्थितीवरून पहावयास मिळाले. कॅनॉलच्या जवळच रक्त पडल्याचे आढळून आल्याने संबंधित व्यक्तीचा खूनच झाल्याची पोलिसांना खात्री झाली. मयताच्या हातामध्ये ब्रासलेट व खिशात बुलेटची चावी आढळून आली होती. या व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी घटनास्थळाचा बारीक तपास केला. त्यानंतर या प्रकरणी २५ फेब्रुवारी रोजी मानवत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर मानवत पोलिसांनी राज्यातील विविध व्यक्तींची माहिती घेणे सुरु केले. त्यातच पुणे शहरातील चर्तुश्रृंगी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल झालेल्या व्यक्तीच्या शोधात त्याचे काही नातेवाईक २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान मानवत पोलीस ठाण्यात आले होते. त्यांना मयत व्यक्तीच्या जवळ सापडलेल्या वस्तू व फोटो पोलिसांनी दाखविल्या. त्यावेळी त्यांनी सदरील व्यक्ती पुणे जिल्ह्यातील बालेवाडी येथील रोहिदास दशरथ बालवडकर (५५) असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, पोलीस नायक मुंजाभाऊ पायघन, पोकॉ.समीर पठाण, बालकिशन मगर व स्थानिक गुन्हे शाखेचे निलेश भूजबळ, सुग्रीव केंद्रे यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांनी पुणे येथील चर्तुश्रृंगी पोलीस ठाणे गाठले. तेथील पोलीस कर्मचाºयांना घेऊन खुनाचा तपास सुरु केला. अवघ्या काही तासातच या खुनातील प्रमुख आरोपी विठ्ठल ज्ञानोबा काळे (रा.थार ता.मानवत, ह.मु.बालेवाडी), नारायण धोंडीबा राठोड (रा.सारंगपूर ता.मानवत) या दोघांना पुणे येथून शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता पोलिसांच्या एका पथकाने अटक केली.या दोन्ही आरोपींना पोलिसांचे पथक मानवत येथे घेऊन येत आहे. तर तिसरा आरोपी महादेव चिंतामणी (रा.सारंगपूर ता.मानवत) याला पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी पूर्णा येथून दुपारी ४ वाजेच्या सुमारास अटक केली.असा केला बालवडकर यांचा खून४पोलिसांनी अटक केलेला या प्रकरणातील प्रमुख आरोपी विठ्ठल ज्ञानोबा काळे हा कुटुंबियांसह पुणे शहरातील बालेवाडी परिसरात राहतो. मयत रोहिदास बालवडकर हा देखील बालेवाडी परिसरातच राहत होता. आरोपी विठ्ठल काळे हा १८ फेब्रुवारी रोजी पत्नी व मुलांसह मानवत तालुक्यातील थार या मूळ गावी आला होता. त्यानंतर मयत रोहिदास बालवडकर हा देखील मानवत तालुक्यात बालेवाडीतून आला. त्यानंतर त्याने विठ्ठल काळे याच्याशी संपर्क केला. त्यानंतर विठ्ठल काळे, नारायण राठोड व महादेव चिंतामणी या तिघांनी २० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री रोहिदास बालवडकर याचा धारधार शस्त्राने खून केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खुनाचे कारण अद्याप अधिकृतपणे समोर आले नसले तरी या प्रकरणाला अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे.
परभणी : पुण्यातील व्यक्तीची धारधार शस्त्राने हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:39 PM