लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरात सोमवारी विविध कार्यक्रम घेण्यात आले़ या कार्यक्रमांतर्गत शिवरायांच्या पुतळ्यावर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली़ सायंकाळी शिवरायांचा जयघोष करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली़ या मिरवणुकीतील ‘जय भवानी जय शिवराय’च्या घोषाने परभणी नगरी दुमदुमून गेली होती. शनिवार बाजार येथून निघालेली ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यत पोहचल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली़ शनिवार बाजार येथून सायंकाळच्या सुमारास मिरवणुकीला प्रारंभ झाला़ अंबारीधारी हत्तीवर शिवरायांच्या मूर्तीची काढलेली ही मिरवणूक शहरवासियांचे आकर्षण ठरली़सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अष्टभूजा देवी मंदिर परिसरात मिरवणूक पोहचली़ अग्रभागी ढोल पथक होते़ हातात भगवे झेंडे घेऊन युवकांनी शिवरायांचा जयघोष केला़ ढोल पथकाला लागूनच अश्वारुढ झालेल्या जिजाऊंच्या लेकी मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या़ अश्व पथकानंतर ऊंटांचे पथकही शहरवासियांचे लक्ष वेधून घेत होते़ अश्व, ऊंट आणि त्यानंतर ढोलपथकाचे सादरीकरण झाले़ ढोल पथकातील वाद्यांनी परिसर दुमदुमून गेला होता़ छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करीत ही मिरवणूक मार्गस्थ होत होती़ गुजरी बाजार येथेहीे ढोल पथकाच्या सादरीकरणाने या मिरवणुकीमध्ये रंगत भरली़ फेटेधारी महिलांसह युवक, युवती या ठिकाणी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले ते, हत्तीवरील छत्रपती शिवरायांची मूर्ती़ रात्री ८ वाजेच्या सुमारास मुख्य मिरवणूक गुजरी बाजार भागात पोहचली़ अंबारीवरील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर या भागातील नागरिकांनी पुष्पवृष्टी केली़ मिरवणुकीच्या सर्वात शेवटी ग्रामीण भागातून आलेल्या शिवप्रेमी नागरिकांच्या सजवलेल्या बैलगाड्या शहरवासियांचे लक्ष वेधून घेत होत्या़ भगव्या कपड्यांनी या बैलगाड्या सजवल्या होत्या़ हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत रात्री उशिरापर्यत ही मिरवणूक चालली़ मिरवणूक पाहण्यासाठी मुख्य मार्गावर दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती़ यावेळी पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त होता.
शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमली परभणी नगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:02 AM