परभणी : येथील तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार मंदार इंदूरकर यांनी पुरवठा विभागाचा अतिरिक्त पदभार घेतला नसल्याच्या कारणावरून त्यांना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी निलंबित केले आहे.
परभणी तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार मंदार इंदूरकर यांना पुरवठा विभागाचा अतिरिक्त पदभार देण्याबाबतचे आदेश १२ जून रोजी काढण्यात आले होते; परंतु इंदूरकर यांनी पदभार स्वीकारला नाही. याबाबत त्यांना तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी २६ जून रोजी नोटीस बजावली होती. त्यानंतर २७ जून रोजी इंदूरकर यांना समक्ष बोलावून कडवकर यांनी अतिरिक्त पदभार स्वीकारण्याचे आदेशित केले होते; परंतु, त्यांनी पदभार स्वीकारला नाही. तसा अहवाल कडवकर यांनी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना सादर केला. त्यानंतर २७ जून रोजी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी नायब तहसीलदार यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. निलंबन कालावधीत इंदूरकर यांना परभणी तहसील कार्यालय मुख्यालय देण्यात आले आहे.