मोहन बोराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यातील विविध गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. तसेच योजना कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील बारा गावच्या नळ योजना बंद असल्याने आगामी काळात या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत.सेलू तालुक्यात ८२ ग्रामपंचायती असून या अंतर्गत वाड्यांची संख्या १९ आहे. ७८ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेची कामे करण्यात आली आहेत. यातील अनेक गावांमध्ये कोट्यावधी रुपये खर्चून कायमस्वरुपी पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने योजनांची कामे करण्यात आली. मात्र किरकोळ दुरुस्ती आणि स्त्रोत कोरडे पडल्याने कोट्यावधी रुपये खर्चूनही गावांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.पाणीपुरवठा योजना जुनाट होऊन स्त्रोत कोरडे पडल्याने आहेरबोरगाव आणि डासाळा येथील नळ योजना बंद आहेत. तर किरकोळ दुरुस्तीअभावी डिग्रस खु. येथील पाणीपुरवठा बंद आहे. डिग्रसवाडी येथील पाणीपुरवठा योजना दुरुस्तीअभावी ठप्प असल्याची माहिती आहे. दुधना काठावर असलेल्या कवडधन येथील पाणीपुरवठा योजना स्त्रोत मोडकळीस आल्याने बंद आहे. कुपटा आणि म्हाळसापूर येथील योजना कालबाह्य झाल्या आहेत. तर मालेटाकळी येथील नळ योजना स्त्रोत कोरडे पडल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प आहे. निपानी टाकळी येथील योजनाही कालबाह्यझाली असून पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्याने ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिंदे टाकळी व तांदूळवाडी येथील योजना जुनाट झाल्याने पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढली नाही. आॅक्टोबर महिन्यातच पाणी पातळीत घट होत असल्याने पाण्याचे स्त्रोत झपाट्याने आटत आहेत. ग्रामीण भागातील हातपंप पाण्याअभावी कोरडे पडल्याने पाणी आणण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, कसुरा व करपरा नदी काठावरील गावांमध्ये आगामी काळात पाणीटंचाई तीव्र होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.आठगाव योजना : बिलाअभावी बंद४आठगाव पाणीपुरवठा योजननेचे वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीने चार महिन्यांपूर्वीच वीजपुरवठा तोडला आहे. त्यामुळे ही योजना बंद पडली आहे. पंपहाऊस, जलशुद्धीकरण केंद्र येथील लाखो रुपयांचे बिल थकीत आहे. या योजनेला निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. टंचाईच्या काळात या योजनेतून कुंडी, म्हाळसापूर, तिडी पिंपळगाव, गुगळी धामणगाव, आहेरबोरगाव, देऊळगाव गात, डासाळा, रवळगाव या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र वीज बिल थकल्याने या योजनेतून काही दिवसच गावांना पाणी मिळते. प्राप्त माहितीनुसार टंचाईच्या काळात या योजनेच्या थकीत वीज बिलाचा भरणा ग्रामपंचायती व जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. त्यानंतर या योजनेतून पाणी मिळणार आहे. तोपर्यंत मात्र ग्रामस्थांचे हाल होत आहेत.कसुरा, करपरा नदीकाठ तहानणारकसुरा व करपरा नदीवर मोठा बंधारा नसल्याने पावसाळ्यातील पाणी वाहून जाते. त्यामुळे उन्हाळ्यात या नदीकाठावरील गावांमध्ये सर्वाधिक पाणीटंचाई निर्माण होते. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने कसुरा व करपरा नदीकाठावरील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. जनावरांच्या चाºयाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट बनणार ंआहे.
परभणी : सेलू तालुक्यातील बारा गावांतील नळ योजना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:52 AM