परभणी : राष्ट्रवादी-भाजपाच्या युतीने कार्यकर्ते अस्वस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:22 AM2019-02-07T00:22:58+5:302019-02-07T00:23:52+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्य व केंद्रातील भाजपा सरकारवर एकीकडे सडकून टीका केली जात असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेत मात्र भाजपाला सत्तेत सहभागी करून घेण्याच्या पक्षाच्या नेत्यांच्या भूमिकामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे़ त्यामुळे जि़प़तील भाजपा सोबतची सत्तेतील भागिदारी संपुष्टात आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्य व केंद्रातील भाजपा सरकारवर एकीकडे सडकून टीका केली जात असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेत मात्र भाजपाला सत्तेत सहभागी करून घेण्याच्या पक्षाच्या नेत्यांच्या भूमिकामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे़ त्यामुळे जि़प़तील भाजपा सोबतची सत्तेतील भागिदारी संपुष्टात आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे़
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ५ मार्चच्या सुमारास लागण्याची शक्यता आहे़ त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून या निवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली आहे़ परभणी लोकसभा मतदार संघ आघाडीच्या जागा वाटपानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे़ त्यामुळे या पक्षानेही कंबर कसली आहे़ त्या दृष्टीकोणातून पक्षाच्या वतीने २३ जानेवारी निर्धार परिवर्तनाचा रॅलीनिमित्त जिंतूर व गंगाखेड येथे जाहीर सभा घेण्यात आल्या़ या जाहीर सभांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली़ केंद्रातील भाजपा सरकारला सत्तेतून घालविण्याची वेळ आली असल्याचा हल्लाबोलही केला़ एकीकडे भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याची भाषा सुरू असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवर मात्र भाजपाला सोबत घेऊनच सत्तेची चव चाखली जात असल्याचा विरोधाभास निर्माण करणारा प्रकार जिल्ह्यात सुरू आहे़ याची कदाचित राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना कल्पना नसेल; परंतु, पक्षाचे कार्यकर्ते मात्र आता अस्वस्थ झाले आहेत़ जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि भाजपाची युती आहे़ राष्ट्रवादीकडे २४ सदस्य संख्याबळ असले तरी साधारणत: दोन वर्षापूर्वी काँग्रेससोबतच्या अंतर्गत वादातून राष्ट्रवादीच्या नेत्यांना ५ सदस्य संख्येचा भाजपा पक्ष जवळचा वाटला़ त्यातून एक सभापती पदही या पक्षाला देण्यात आले़ शिवाय राज्यात आणि केंद्रात भाजपा सत्तेत असल्याने जिल्हा परिषदेत वेगळा निधी आणता येईल, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची अपेक्षा होती़ परंतु, गेल्या दोन वर्षांत भाजपाच्या मदतीने अधिकचा निधी आणण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना अपयश आले़ उलट शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी नेत्यांची जिल्हा नियोजन समितीचा निधी देताना दमछाक केली़ त्यामुळे भाजपाचा दोन वर्षांत तरी राष्ट्रवादीला काडीमात्र फायदा झाला नसल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे एकीकडे भाजपावर कडक टीका करायची आणि दुसरीकडे स्थानिक पातळीवर याच पक्षाला सत्तेत सहभागी करून घ्यायचे, ही पक्षाची भूमिका स्थानिक कार्यकर्त्यांना पटलेली नाही़ त्यामुळे ही युती तोडावी, अशी चर्चा कार्यकर्त्यांमधून जोर धरू लागली आहे़ याबाबत राष्ट्रवादीचे नेते काय भूमिका घेतात? याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे़
काँग्रेससोबत आघाडी करण्यावरून चर्चा
जिल्हा परिषदेत साधारणत: दोन वर्षापूर्वी सत्ता स्थापनेच्या वेळी कॉँगे्रस आणि राष्ट्रवादीमध्ये बरीच वादाची परिस्थिती होती़ गेल्या वर्षभरापासून यात बदल झाला आहे़ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी यांच्यातील मतभेद गतवर्षी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने दूर झाले असून, राज्य व केंद्राप्रमाणे समविचारी पक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीनेही आता जिल्हा परिषदेत आघाडी करावी, अशी कार्यकर्त्यांना व सदस्यांना अपेक्षा वाटू लागली आहे़ जिल्हा परिषदेत काँग्रेसचे ६ सदस्य असून, भाजपापेक्षा एक सदस्य जास्तीचा आहे़ त्यामुळे आगामी निवडणुकीत आघाडीच्या एकीचा संदेश जनतेमध्ये जावा, या दृष्टीकोणातून काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी जिल्हा परिषदेत व्हावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे़