परभणी : पालकमंत्र्यांच्या विरोधात राष्ट्रवादी-काँग्रेसचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:12 AM2018-06-14T00:12:22+5:302018-06-14T00:12:22+5:30

जिल्हा नियोजन समितीच्या निधी वितरणात अन्याय केल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आमदार व सदस्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात एल्गार पुकारला असून, या पुढे समान निधी वाटपासाठी मतदान घ्यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याकडे केली आहे़

Parbhani: NCP-Congress's Elgar against Guardian Minister | परभणी : पालकमंत्र्यांच्या विरोधात राष्ट्रवादी-काँग्रेसचा एल्गार

परभणी : पालकमंत्र्यांच्या विरोधात राष्ट्रवादी-काँग्रेसचा एल्गार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा नियोजन समितीच्या निधी वितरणात अन्याय केल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आमदार व सदस्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात एल्गार पुकारला असून, या पुढे समान निधी वाटपासाठी मतदान घ्यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याकडे केली आहे़
राष्ट्रवादी काँग्रेसचे आ़ विजय भांबळे, आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ मधुसूदन केंद्रे, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा नियोजन समितीच्या २२ सदस्यांनी बुधवारी सकाळी ११़३० च्या सुमारास जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांची भेट घेतली़ यावेळी त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हा नियोजन समितीचा निधी वाटप करताना कसा अन्याय केला जात आहे, याची व्यथा मांडली़
समितीच्या सदस्यांना निधी वितरणाचे अधिकार असताना पालकमंत्र्यांना अधिकार दिल्याने असमान निधी वाटप होत आहे़ जिल्ह्यातील सेलू, मानवत, सोनपेठ या नगर परिषदा आणि पालम नगरपंचायतीला सुमारे अडीच कोटी रुपयांचा अधिकचा निधी दिला जातो़; परंतु, जिंतूर, पाथरीसारख्या नगरपालिकांना ५० लाखापर्यंतच निधी दिला जातो़ त्यामुळे निधी वाटपात मनमानी करण्यात येत आहे़ पुनर्विलोकन निधीमध्येही भेदभाव करण्यात आल्याचा आरोप आ़ दुर्राणी, आ़ भांबळे यांनी केला़ जिल्हा नियोजन समितीचे आराखडे व इतर कामे मंजूर करण्याचे अधिकार समितीला आहेत; परंतु, समितीने दिलेल्या ठरावामुळे हे अधिकार पालकमंत्र्यांना प्राप्त होतात आणि पालकमंत्र्यांकडून या अधिकारांचा दुरुपयोग केला जात आहे़ तेव्हा जिल्हा नियोजन समितीलाच मंजुरीचे अधिकार द्यावेत व तसा ठराव घेऊन नियोजन समितीचे कामकाज चालवावे, जिल्हा नियोजन समितीमधील सर्व प्रशासकीय मान्यता मंजुरी, निधी वितरणाचे ठराव समितीच्या बहुमताप्रमाणेच करावेत आणि पालकमंत्र्यांनी दिलेले पूर्वीचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ विजय भांबळे, आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, जिल्हा परिषद सभापती श्रीनिवास मुंडे, गटनेते अजय चौधरी, जिल्हा परिषद सदस्य ममता मते, अरुणा काळे, संगीता घोगरे, इंदूबाई अंबोरे, शालिनीताई राऊत, इंद्रायणी रोडगे, वैशाली जाधव, राजेंद्र लहाने, नगरसेवक सुनील देशमुख, शेख कलीम रहीमोद्दीन आदींची नावे आहेत़
निधी वितरणावरूनच बैठक लांबल्याची चर्चा
जिल्हा नियोजन समितीची ११ जून रोजी पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार होती़ तसा पाटील यांचा अधिकृत शासकीय दौराही जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला होता़; परंतु, पाटील यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आला़
परिणामी नियोजन समितीची बैठकही रद्द झाली़ आता ही बैठक रद्द होण्यामागे निधी वितरणातील असमानतेचे कारण असल्याची चर्चा होवू लागली आहे़ विशेष म्हणजे पालकमंत्री पाटील हेही फारसे परभणी संदर्भात गंभीर नाहीत़ कारण त्यांचे परभणीला गेल्या दीड वर्षात मोजकेच दौरे झाले आहेत़
पहिल्यांदाच झाला : पालकमंत्र्यांच्या निर्णयाला विरोध
पालकमंत्रीपदी गुलाबराव पाटील यांची जवळपास दीड वर्षापूर्वी नियुक्ती करण्यात आली़ त्यानंतर गतवर्षी पाटील यांच्याच उपस्थितीत आर्थिक वर्षाच्या अंतीम टप्प्यातील नियोजन समितीच्या निधीचे वितरण करण्यात आले होते़ त्यानंतर मार्च अखेरीसही दुसºयांदा त्यांच्या मान्यतेने निधीचे वितरण झाले़ यावेळी मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांसह राष्ट्रवादीच्या आमदारांनी या निधी वितरणावर आक्षेप घेतला आहे़ यापुढील निधी वितरणासाठी मतदान प्रक्रियेचा अवलंब करावा, अशी मागणी केली आहे़ त्यामुळे पहिल्यांदाच गुलाबराव पाटील यांच्या निर्णयाला जिल्ह्यातील नेत्यांनी विरोध केल्याचे समोर आले आहे़ यासंदर्भात पालकमंत्री पाटील काय भूमिका घेतात? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़

Web Title: Parbhani: NCP-Congress's Elgar against Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.