लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पालम व पूर्णा तालुक्याच्या मध्यभागी गोदावरीनदीमध्ये तयार झालेल्या जांभूळबेट या निसर्गरम्य स्थळाचा विकास करण्यासाठी ११ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी लागणार असून, या संदर्भातील आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे़पालम व पूर्णा तालुक्यांच्या मध्यभागी गंगाखेडपाूसन २२ किमी अंतरावर गोदावरीनदीपात्रात जांभूळबेट हे निसर्गरम्य ठिकाण अनेक वर्षापूर्वी विकसित झाले़ या बेटावर महादेवाचे हेमाडपंथी मंदिर असून, जांभळांची मोठ्या प्रमाणात झाडे असल्याने ते जांभूळबेट नावाने ओळखले जाऊ लागले़ हे एक निसर्गरम्य ठिकाणी असून, या बेटावर मोरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे़ दोन दशकांपूर्वी या बेटावर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असायची़ परंतु, या निसर्गरम्य स्थळाची देखभाल व दुरुस्ती प्रशासनाने व्यवस्थित केली नसल्याने त्याचा काही भाग नदीच्या पाण्यामध्ये खचत आहे़ पर्यावरण प्रेमींनी अनेकदा हा निसर्गरम्य ठेवा जोपासण्याची मागणी केली; परंतु, प्रशासन दरबारी याकडे फारशे गांभिर्याने लक्ष दिले जात नाही़ काही दिवसांपूर्वीच या जांभूळबेटाचा विकास करण्यासाठी नैसर्गिक पर्यटनमधून आराखडा तयार करण्यात आला आहे़ येथील विकास कामांसाठी ११ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीची गरज आहे़ सदरील नियोजित आराखडा शासनास पाठविण्यात येणार आहे़ या संदर्भातील निर्णय सहा महिन्यांपूर्वी झाला होता; परंतु, त्याची अंमलबजावणी झालेली नाही़अनेक वेळा बैठका घेऊनही उपयोग होईनाजांभूळबेट विकासाच्या अनुषंगाने अनेक वेळा प्रशासकीय पातळीवर बैठका घेण्यात आल्या; परंतु, ठोस निर्णय मात्र घेण्यात आले नाहीत़ परिणामी जांभूळबेटाच्या विकासाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित राहत आहे़ विशेष म्हणजे जांभूळबेटला जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या रस्त्यासाठी मात्र मंजुरी मिळण्यापूर्वीच लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता़ त्याला मंजुरी मिळाली़पर्यटनस्थळ विकासासाठी तुटपुंजा निधीजिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यातील पर्यटनस्थळ विकासासाठी मूलभूत सुविधांकरिता फक्त ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे़ या तरतुदीस २२ जून रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली़ जिल्ह्यात अनेक महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळे आहेत; परंतु, हा नैसर्गिक वारसा जपण्यासाठी प्रशासकीय व लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती दिसून येत नाही़ त्यामुळेच यासाठी अत्यंत तुटपुंज्या निधीची तरतूद करण्यात येत असल्याने पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे़
परभणी : जांभूळबेट विकासासाठी १२ कोटींची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 11:27 PM