लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील बसस्थानक परिसरातील डिग्गी नाल्यावर नव्याने बांधलेली भिंत पडली असल्याने या नाल्यातील पाणी पुन्हा स्थानकामध्ये घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ त्यातच काही दिवसांपूर्वी बांधलेली भिंत पडल्याने बांधकामाविषयीही शंका उपस्थित होत आहे़परभणी बसस्थानकाची मागील काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे़ या बसस्थानकात सद्यस्थितीत गुडघ्या इतके खड्डे पडले आहेत़ पावसाळ्यात तर डिग्गी नाल्यातील घाण पाणी बसस्थानकात शिरते़ बसस्थानकातील पाण्यामुळे डिग्गी नाल्यावरील संरक्षक भिंत पडली होती़ बसस्थानकात घाण पाण्याचा ओघ वाढला होता़ ही भिंत बांधण्यासाठी मनपा किंवा बसस्थानक प्रशासनाने पुढाकार घेत नव्हते़ त्यामुळे ही भिंत बांधायची कोणी, याचा वाद अनेक महिने सुरू होता़ त्यामुळे प्रवाशांना घाण पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागत होते़ त्यानंतर बसस्थानक प्रशासनाने या नाल्यावरील भिंत बांधली़परंतु, नव्याने बांधण्यात आलेली भिंत पुन्हा पडली आहे़ त्यामुळे भविष्यात डिग्गी नाल्यातील पाणी बसस्थानकात शिरून बसस्थानकाला तळ्याचे स्वरुप येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ परिणामी पूर्वीची समस्या कायम राहिली आहे. दरम्यान नव्याने भिंत बांधूनही ती पडल्याने या बांधकामाविषयीही प्रवाशांतून शंका उपस्थित केली जात आहे़बसस्थानकात पडले गुडघ्याइतके खड्डेपरभणी बसस्थानकाचे बसपोर्टमध्ये रुपांतर होईल, परभणीकरांना अपेक्षा आहे़ परंतु, बसपोर्टची प्रक्रिया निविदामध्येच रखडल्याने या बसपोर्टला केव्हा मुहूर्त लागतो, हे अद्यापही निश्चित नाही़ सध्या परभणी बसस्थानक परिसराची बकाल अवस्था झाली असून, बसस्थानकात गुडघ्या इतके खड्डे पडले आहेत़ या खड्ड्यातूनच बस चालकांना बस काढावी लागत आहे़ प्रवाशांनाही गैरसोयींचा सामना करावा लगत आहे़ त्यामुळे बस पोर्टचे काम सुरू होण्याअगोदर बसस्थानकातील खड्डे बुजवावेत, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे़
परभणी : नव्याने उभारलेली भिंत पुन्हा पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:53 AM