परभणी: गंगाखेडमध्ये सोमवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांनी केलेल्या वक्तव्यातून पोलीस दलाची बदनामी झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याच्या कारणास्तव गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये मंगळवारी रात्री उशिरा आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गंगाखेड पोलीस व तालुका प्रशासनातर्फे संत जनाबाई महाविद्यालयात सोमवारी दुपारी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार गुट्टे यांनी विषय सोडून पोलीस दलातील अधिकारी, तसेच अंमलदारांविषयी उद्देशपूर्वक अप्रतीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने वक्तव्य केले. त्यात पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हप्ते घेतात, असे बोलून जनतेमध्ये पोलिसांची प्रतिमा मलिन होईल, असे वक्तव्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
त्यांच्या भाषणातून पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याचे दिसून आल्याने याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात कलम ५०० भादंवी व कलम तीन पोलीस अधिनियमान्वये आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाने काढलेल्या प्रसिद्धपत्रकात नमूद करण्यात आली आहे.सूचना करणे चुकीचे आहे का?कुठल्याही सण उत्सावासह कायमच कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. गणेशोत्सवातही गालबोट लागू नये म्हणून मी तालुक्यातील अवैध धंदे बंद करा, अशी सूचना केली. यात काही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अशा धंद्याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याने अडचणी येतात. त्यामुळे हप्तेखोरी बंद झाल्यास तालुक्यातील गुन्हेगारी कमी होईल, या उद्देशाने मी सूचना केली होती.