लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: वर्तमानपत्र हे समाज उन्नतीचे साधन असून वर्तमानपत्र नसलेल्या चळवळीची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ.कल्याण गोपनर यांनी केले.येथील युगांधर फाऊंडेशन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने व्याख्यानमालेत ‘समाजसुधारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांची प्रेरक पत्रकारिता’ या विषयावर गोपनर बोलत होते. ते म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता आजही प्रेरक ठरेल, अशी आहे. मूक समाजाच्या वेदना, विद्रोह प्रगट करण्यासाठी एखाद्या प्रकाशन पीठाची गरज होती. या गरजेतूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेकडे वळले. वृत्तपत्रातील सर्व मजकूर डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वत: लिहित असत. जनता, बहिष्कृत भारत ही दोन वृत्तपत्रे त्यांनी पुढे चालविली. मानगाव येथे परिषद, महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश, मनुस्मृती दहन या सर्व चळवळी वृत्तमानपत्रातून छापून आल्या. त्यामुळे समाज उन्नतीचे साधन म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्राकडे बघितले, असे डॉ.गोपनर यांनी सांगितले.कार्यक्रमास प्रा.डॉ.भीमराव खाडे, यशवंत मकरंद, बी.एच. सहजराव, एल.ई. कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. संस्थाध्यक्ष संजीव अढागळे यांनी प्रास्ताविक केले. सुखदेव ताजणे यांनी सूत्रसंचालन केले. सम्राट साळवे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशिष इंगोले, डॉ.डी.एस. खरात, एन.व्ही. वाघमारे, ब्रह्मानंद साळवे, मिलिंद अढागळे, मनोहर खंदारे, प्रवीण जोंधळे, भास्कर मकरंद आदींनी प्रयत्न केले.
परभणी : वर्तमानपत्र हे समाज उन्नतीचे साधन- कल्याण गोपनर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:49 AM