लोकमत न्यूज नेटवर्कबामणी (परभणी): शेतजमिनीचे खरेदीखत झाल्यानंतरही बनावट कागदपत्राच्या अधारे विक्रेत्याच्या मुलाच्या नावावर जमीन करुन फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन मंडळ अधिकारी, ग्रामसेवक व तलाठ्यासह ८ जणांविरुद्ध बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अंबरवाडी येथील किशनराव घुगे यांनी राघोजी जाधव यांच्याकडून अंबरवाडी शिवारातील गट क्रमांक ४८० मधील १ हेक्टर ५७ गुंठे जमीन ५ जून १९८५ रोजी खरेदी केली होती; परंतु, नजर चुकीने विक्रीदार राघोजी जाधव यांचे नाव त्या सातबारावरुन कमी करण्यात आले नाही. याचाच फायदा घेत त्यांचे वारसदार चार मुले फुलसिंग राघोजी जाधव, परसराम जाधव, विठ्ठल जाधव, बाबुराव जाधव व मुलगी सुभाबाई देविदास राठोड यांनी तत्कालीन ग्रामसेवक संतोष नारायण काकडे यांच्या सहाय्याने २०१४ मध्ये राघोजी जाधव यांचे १९८५ चे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करुन दिले. त्यानंतर सदरील जमिनीचा फेर अंबरवाडी येथील तत्कालीन तलाठी सचिन तुकाराम नवघरे व मंडळ अधिकारी प्रशांत बळवंतराव राखे यांच्या सहाय्याने न्यायालयातून कोणतेही वारसा प्रमाणपत्र न काढता बनावट कागदपत्रांच्या आधारे ती जमीन राघोजी जाधव यांचे चार मुले व एका मुलीच्या नावे करुन दिली.त्यानंतर वरील चारही भावांनी मिळून ती जमीन सुभाबाई देविदासराव राठोड यांना १०० रुपयांच्या शपथपत्राआधारे वाटणी करुन नावे करुन दिली व याचा रितसर फेरही लावून घेतला. त्यानंतर सुभाबाई राठोड यांनी किशनराव घुगे यांना सदरील जमीन माझ्या वडिलांच्या मालकीची असून ती माझ्या वाटणीला आलेली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे सदरील जमीन हडप करण्याचा कांगावा करत त्या जमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरुन बामणी पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.जिंतूर : न्यायालयाने दिला अहवाल सादर करण्याचा आदेश४किशनराव घुगे यांचा मुलगा शिवाजी घुगे यांनी याबाबत १९ जुलै २०१९ रोजी जिंतूर न्यायालयात धाव घेत न्याय देण्याची मागणी केली.४ या सर्व बाबीचा विचार करुन न्यायधिशांनी ७ आॅगस्ट २०१९ रोजी आठही जणांविरोधात १५६/३ प्रमाणे गुन्हा दाखल करुन अहवाल सादर करण्याचे आदेश बामणी पोलिसांना दिले. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बामणी पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे४आरोपींमध्ये फुलसिंग जाधव, परसराम जाधव, विठ्ठल जाधव, बापुराव जाधव, सुभाबाई राठोड, तत्कालीन ग्रामसेवक संतोष नारायण काकडे,तत्कालीन तलाठी सचिन तुकाराम नवघरे व तत्कालीन मंडळ अधिकारी पी.बी. राखे यांचा समावेश आहे.
परभणी : तलाठ्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:57 PM