लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील जायकवाडी वसाहत परिसरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या दोन कार्यालयांतून संगणक, प्रिंटर आदी दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.येथील कारेगावरोड भागातील जायकवाडी परिसरात जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक २ अंतर्गत उपविभाग क्रमांक १ आणि उपविभाग क्रमांक १० ही कार्यालये आहेत. २२ फेब्रुवारी रोजी रात्री, १ आणि १० क्रमांकाच्या उपविभागाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी संगणक, नवीन प्रिंटर, बॅटरी आदी साहित्य चोरुन नेले आहे. या घटनेत एक संगणक, तीन प्रिंटर आणि काही बॅटऱ्या चोरट्यांनी लांबविल्याची माहिती मिळाली. दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी रात्रीही विभागीय कार्यालयाच्या मुख्य कक्षाचा दरवाजा उघडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र या ठिकाणी सुरक्षा रक्षक असल्याने चोरट्यांचा बेत फसला, अशी माहिती शाखा अभियंता गजानन वैरागड यांनी दिली. या भागात सातत्याने संगणक, प्रिंटरची चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वी जीवन प्राधिकरण कार्यालयातही चोरीची घटना घडली होती. पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
परभणी : जायकवाडीतील दीड लाखाचे साहित्य चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:36 PM