लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे घोषित केले असून शासनाच्या निर्णयातील काही अटींमुळे परभणी जिल्ह्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती तसेच कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकºयांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. या निर्णयानुसार १ नोव्हेंबर २०१८ ते १५ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकºयांनाच २०० रुपये प्रति क्विंटल दराने अनुदान दिले जाणार आहे. परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पन्न घेतले जाते; परंतु, जिल्ह्यातील एकाही बाजार समितीमध्ये कांदा विक्री केला जात नाही. खुल्या बाजारपेठेत हे शेतकरी कांद्याची विक्री करतात. या शेतकºयांनाही यावर्षीच्या दुष्काळाचा फटका बसला आहे. तसेच कांद्याला कमी भाव मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकºयांनाही नुकसान सहन करावे लागले. मात्र राज्य शासनाच्या निर्णयानुसार केवळ बाजार समितीतच कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना अनुदानाचा लाभ मिळाला असल्याने जिल्ह्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. तेव्हा शासनाने बाजार समितीत कांदा विक्री केल्याची अट रद्द करावी, अशी मागणी कांदा उत्पादकांमधून होत आहे.
परभणी : कांदा उत्पादक अनुदानापासून राहणार वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 1:02 AM