लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सच्चा शिवसैनिक म्हणून गेली अडीच वर्षे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात प्रामाणिकपणे पक्ष वाढीसाठी काम केले; परंतु, या कालावधीत खा.बंडू जाधव यांनी फक्त आपला वापर करुन घेतला. या काळात शिवसेनेत आपली घुसमट झाली, असा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष मुरकुटे यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला.परभणी येथे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा गंगाखेड विधानसभा संघटक संतोष मुरकुटे यांनी कार्यकर्त्यांसह जोरदार शक्तीप्रदर्शन करीत बैठक घेतली. तत्पूर्वी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खा. बंडू जाधव यांच्यावर अनेक आरोप केले. ते म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे आ.मधुसूदन केंद्रे यांच्यासाठी राष्ट्रवादीत असताना प्रामाणिकपणे काम केले; परंतु, नंतरच्या एक वर्षाच्या काळात केंद्रे यांचा कारभार मनाला पटला नाही. त्यामुळे खा.बंडू जाधव यांच्या उपस्थितीत त्यांच्या संमतीनेच शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार गेली अडीच वर्षे मतदारसंघात पक्षवाढीसाठी तन-मन-धनाने प्रयत्न केले; परंतु, एकाही कार्यक्रमात खा.जाधव यांनी आपण विधानसभेचे पुढील उमेदवार असल्याचे घोषित केले नाही. केवळ त्यांनी आपला वापर करुन घेतला. तसेच आपली पिळवणूक केली गेली. आता पक्षात विधानसभा निवडणुकीचे चार उमेदवार झाले आहेत. प्रत्येक इच्छुकाला ते तिकीट देण्याचे आश्वासन देत आहेत. गेल्या अडीच वर्षात पक्षामध्ये आपली घुसमट झाली. गंगाखेड विधानसभा संघटक म्हणून आपण काम करीत असताना उपजिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. नवी जबाबदारी देताना विधानसभा संघटक हे गंगाखेड, पूर्णा व पालम या तीन तालुक्यांंसाठी असलेले पद सोडण्यास सांगण्यात आले व उपजिल्हाप्रमुखपदही एका गंगाखेड तालुक्यापुरतेच देऊन आपले खच्चीकरण करण्यात आले. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जिल्हा नेतृत्वाकडून कदर केली जात नाही. त्यामुळेच यापुढे सक्रिय कार्यकर्ता म्हणून शिवसेनेत कार्यरत राहणार नाही. आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. तर संतोष मुरकुटे मित्र मंडळाच्या माध्यमातून आपले सामाजिक कार्य सुरु राहील. आगामी विधानसभा निवडणूक कार्यकर्त्यांशी चर्चा करुन अपक्ष म्हणून लढविण्याची आपली तयारी असल्याचे ते म्हणाले. शिवसेना पक्षाविषयी आपली कोणतीही नाराजी नाही. मतदारसंघातील बहुतांश शिवसैनिक हे आपले कार्यकर्ते आहेत, ते यापूर्वीही माझ्यासोबत होते अन् आताही माझ्या सोबतच आहेत, असेही ते म्हणाले.
परभणी : शिवसेनेत अडीच वर्षांत फक्त घुसमटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 12:15 AM