लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ज्या विषयांना औरंगाबाद बोर्डाकडून परवानगी घेतली नाही, अशा विषयाचे बारावी परीक्षेचे गुणपत्रक देण्यास शिक्षण विभागाने विरोध केल्याने मंगळवारी येथील जि़प़ कन्या प्रशालेमध्ये काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती़महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, ११ जून रोजी येथील जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेमध्ये महाविद्यालय निहाय विद्यार्थ्यांचे गुणपत्रक वितरित करण्यात आले़ हे गुणपत्रक घेण्यासाठी विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक जि़प़ कन्या प्रशालेत दाखल झाले तेव्हा ज्या विद्यार्थ्यांनी पीकशास्त्र विषय घेवून बारावीची परीक्षा दिली आहे़ त्यांचे गुणपत्रक देण्यास शिक्षण विभागाने नकार दिला़ शिक्षण मंडळाची परवानगी घेतल्यानंतरच गुणपत्रक दिले जाईल, अन्यथा प्रती विद्यार्थी ११०० रुपये भरावे लागतील, असे शिक्षण विभागातून सांगण्यात आले़ वास्तविक पाहता महाविद्यालयांना पीकशास्त्र विषयासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे़ परंतु, मंडळाची मान्यता घेण्याचे नवीन धोरण सुरू केल्यामुळे सुमारे १७६ महाविद्यालयांना गुणपत्रक मिळाले नाही़ जवळपास २ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी गुणपत्रकांपासून वंचित राहिले आहेत़ शिक्षण विभाग महाविद्यालयांची अडवणूक करीत असल्याचा आरोप प्राध्यापकांनी केला़ परवानगी घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे़ मंडळाने देखील या विद्यार्थ्यांचा आॅनलाईन निकाल जाहीर केला आहे, मग गुणपत्रक देण्यास का अडवणूक केली जात आहे? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला़ दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांचे गुणपत्रक वितरित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे़
परभणी : बोर्डाची परवानगी नसल्याने गुणपत्रक देण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:36 PM