लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केबीसी कंपनीत पैसे गुंतविण्यास लावून ४० लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्या़ डी़ व्ही़ कश्यप यांनी ५ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करून तपास करण्याचे आदेश कोतवाली पोलिसांना दिले आहेत़या प्रकरणाची अॅड़ जितेंद्र घुगे यांनी दिलेली माहिती अशी, परभणी येथील डॉ़ आंबेडकरनगर येथे राहणारे महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी मुकूंद नंद यांनी केबीसी कंपनीत स्वत:च्या नावे ३१ लाख रुपये गुंतविले होते़ तसेच पत्नीच्या नावे जवळपास ९ लाख रुपये गुंतविले होते़ केबीसी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी या पैशांचा परतावा केला नाही़ आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर नंद यांनी कोतवाली पोलीस ठाणे व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली़ मात्र आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला नाही़त्यामुळे त्यांनी अॅड़ जितेंद्र एऩ घुगे यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली़ याचिकाकर्त्याने आपली आयुष्यभराची कमाई व निवृत्तीनंतर मिळालेली भविष्यनिर्वाहची रक्कम पूर्णत: केबीसी कंपनीमध्ये गुंतविली असून, या प्रकरणात याचिकाकर्त्याची घोर फसवणूक झाली आहे़ तेव्हा केबीसी कंपनी व भाऊसाहेब चव्हाण याच्या मालमत्तेतून ही रक्कम वसूल होणे आवश्यक आहे़ त्यासाठी कलम ३ व ४ महाराष्ट्र ठेवीदारांची गुंतवणूक संरक्षण कायदा १९९९ प्रमाणे आरोपींविरूद्ध कारवाई करावी, असा युक्तीवाद अॅड़ घुगे यांनी केला़ हा युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्या़ डी़व्ही़ कश्यप यांनी केबीसी कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब चव्हाण, संचालक आरती चव्हाण, संदीप जगदाळे, सागर पाटील, सुनील आहेर यांच्याविरूद्ध फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश कोतवाली पोलीस ठाण्याला दिले आहेत़
परभणी : केबीसी फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 1:18 AM