लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील रस्त्याचे काम करण्यासाठी वेळोवेळी या मार्गावरील वाहतूक बंद केली जात असल्याने वाहनधारक जाम वैतागले आहेत़ मनपाचे कामावर नियंत्रण राहिले नसल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़जिल्हा स्टेडियम परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शाही मशिदीपर्यंत सिमेंट काँक्रेट रस्ता, दुभाजक, नाली बांधकाम या कामाला दोन वर्षापूर्वी सुरुवात झाली होती़ मात्र अद्यापपर्यंत हे काम पूर्ण झाले नाही़ सद्यस्थितीला सिमेंट रस्ता बांधून तयार झाला आहे़ दोन्ही बाजुंच्या नाल्या करण्यात आल्या़ मात्र या रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकणे आणि नाल्यांवरील ढापे टाकण्याचे काम अर्धवट आहे़ तसेच महात्मा फुले यांच्या नियोजित पुतळा परिसरात पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे़ हे काम गतीने पूर्ण केले जात नाही़ या कामासाठी वेळोवेळी वाहतूक बंद केली जात आहे़ १५ दिवसांपूर्वी महात्मा फुले यांच्या नियोजित पुतळा परिसरात पेव्हर ब्लॉक टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली़ हे काम संथगतीने होत आहे़ अनेक दिवस काम बंद ठेवले जाते़ मधेच कधी तरी खड्डे खोदण्याचे काम सुरू होते़ पुन्हा चार-पाच दिवस काम बंद राहते़ सोमवारी या मार्गावरील वाहतूक बंद करून काम करण्यात आले़ त्यामुळे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला़ हेच काम रविवारी सुटीच्या दिवशी किंवा रात्रीच्या वेळी करण शक्य होते़ मनमानी पद्धतीने काम केले जात असल्याने वाहनधारक मात्र त्रस्त झाले आहेत.मनपाचे नियंत्रण सुटलेशहर महानगरपालिकेंतर्गत या रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे़ काम पूर्ण करण्याची मुदत केव्हाच संपून गेली असताना मनपातील अधिकारी मात्र संबंधितांवर कोणतीही कारवाई करीत नाहीत़ त्यामुळे या कामाला मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत आहे़ मुदत संपूनही काम पूर्ण होत नसेल तर संबंधितांवर काय कारवाई केली? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ या रस्त्यावर दुभाजक टाकणे, नाल्यांवरील ढापे टाकण्याचे काम रखडले आहे़ महापालिकेने ही कामे तातडीने पूर्ण करून घ्यावीत, अशी मागणी होत आहे़
परभणी : मनमानी कामाने वैतागले नागरिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:02 AM