लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बारावीच्या परिक्षेंतर्गत भौतिकशास्त्र विषयाचा पेपर शिक्षण मंडळाने ठरवून दिलेल्या वेळेपूर्वीच विद्यार्थ्यांना दिल्या प्रकरणी पिंगळी येथील गोकूळनाथ कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रप्रमुखांना माध्यमिक शिक्षणाधिकारी वंदना वाव्हुळ यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़जिल्हाभरात बारावीच्या परीक्षा सुरू आहेत़ परभणी तालुक्यातील पिंगळी येथील गोकूळनाथ कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रावरही या परीक्षा सुरू आहेत़ २५ फेब्रुवारी रोजी बारावी विज्ञानचा भौतिकशास्त्र विषयाचा सकाळी पेपर होता़ या केंद्राला जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी भेट दिली असता, विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाने ठरवून दिलेल्या वेळेपूर्वीच पेपर दिल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली़याबाबत त्यांनी केंद्रप्रमुखांना विचारणा केली असता, समाधानकारक उत्तर देता आले नाही़ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी वाव्हुळ यांच्याशी चर्चा केली़ त्यानंतर वाव्हुळ यांनी या प्रकरणी गोकूळनाथ कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रप्रमुखांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़ या नोटिसीला बुधवारपर्यंत केंद्रप्रमुखांनी उत्तर दिले नव्हते़ जिल्हाधिकाऱ्यांच्याच पाहणीत हा प्रकार निदर्शनास आल्याने या केंद्रावर कडक कारवाईचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत़
परभणी : वेळेपूर्वीच विद्यार्थ्यांना दिला पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:28 AM