लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयात मूबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र २० दिवसांतून एकवेळा पाणी मिळत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.परभणी शहराला राहटी येथील बंधाºयातून पाणीपुरवठा केला जातो. शहरासह परिसरातील गावांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघावा यासाठी आ.डॉ.राहुल पाटील यांनी दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार नदीपात्रात सोडलेले पाणी राहटी बंधाºयात दाखल झाले आहे. त्यामुळे शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघणे गरजेचे होते. मात्र महानगरपालिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे शहरवासियांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मनपाच्या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नागरिकांना १५-१५ दिवस पाणी मिळत नाही. मागील सहा महिन्यांपासून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात तर २० ते २२ दिवसांतून एकवेळा नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. शहरातील जलवाहिनी जागोजागी फुटली आहे. त्यामुळे नळाला पाणी सोडल्यानंतरही मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. दुष्काळी परिस्थितीत एकीकडे पाणी उपलब्ध होत नसताना परभणी शहरातील रस्त्यांवर मात्र अनेक ठिकाणी पाण्याचे डोह साचल्याचे पहावयास मिळते. महापालिकेने जलवाहिनीची गळती दुरुस्त करण्याचे काम हाती घेणे आवश्यक होते; परंतु, गळतीही दुरुस्त केली नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्यय सुरुच आहे. शहरात निर्माण झालेली कृत्रिम पाणीटंचाई दूर करण्यासल्लाी महापालिकेने पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, अशी वारंवार मागणी करुनही मनपाचे प्रशासन मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. शासनाने टंचाई काळात पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना दिल्या असतानाही परभणी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याने शहरवासियांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहरातील टंचाईची परिस्थिती लक्षात घेता त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
परभणी : मनपाच्या नियोजनाअभावी परभणीत कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:04 AM