लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ठणठणीत आरोग्य ठेवण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, हे येथील डॉ़ राम पवार यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे़ औरंगाबाद येथे झालेल्या ट्रायथॉलॉन या स्पर्धेत त्यांनी यश संपादन करून भावीपिढीसमोर आरोग्य संवर्धनाचा परिपाठ घालून दिला आहे़औरंगाबाद येथील एमजीएम संस्थेने डुलेफॉन आणि ट्रायथॉलॉन या दोन स्पर्धा प्रकारांचे आयोजन केले होते़ दोन्ही स्पर्धा या स्पर्धकाच्या परिश्रमाचा कस लावणाऱ्या स्पर्धा होत्या़ परभणीतील डॉ़ राम पवार यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेतला आणि संयोजकांनी दिलेल्या मुदतीत ही स्पर्धाही पूर्ण केली़ याबद्दल त्यांना संयोजकांच्या वतीने स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले़ डॉ़ राम पवार हे आरोग्य चांगले रहावे, यासाठी नियमित धावणे, पोहणे आणि सायकलिंगचा सराव करतात़ त्याचप्रमाणे गिर्यारोहणासारख्या मोहिमांमध्येही त्यांनी सहभाग नोंदविला आहे़ याच काळात औरंगाबादच्या एमजीएम कॅम्पसमध्ये ट्रायथॉलॉनसारखी अवघड स्पर्धा आयोजित केली होती़ या स्पर्धेत डॉ़ पवार यांनी ३५ ते ४५ वर्षे वयोगटामध्ये सहभाग नोंदविला़ त्यात त्यांनी यश संपादन केले़ या स्पर्धेत राज्यभरातून १०० स्पर्धक सहभागी झाले होते़सातत्याने सराव केल्याने मिळाले यशपरभणीमध्ये आम्ही १० ते १५ जणांचा गट तयार केला असून, या गटाच्या माध्यमातून दररोज धावणे, सायलिंगचा सराव केला जातो़ त्यामुळेच या स्पर्धेत मी टिकाव धरू शकलो़ या स्पर्धेत दीड किमी पोहण्यासाठी ७० मिनिटांचा वेळ दिला होता़ ही स्पर्धा ५० मिनिटांत पूर्ण केली़ ४० किमी सायलिंगसाठी २ तासांचा वेळ दिला होता़ ती १ तास ५४ मिनिटांत पूर्ण केली आणि शेवटच्या १० किमी धावण्याच्या स्पर्धेसाठी ८० मिनिटांचा वेळ दिला होता़ मात्र ६४ मिनिटांतच ही स्पर्धा पूर्ण करून यश संपादन केले, असे डॉ़ राम पवार यांनी सांगितले़ विशेष म्हणजे या तीनही प्रकारच्या स्पर्धा सलग साडेचार तासांत पूर्ण करावयाच्या होत्या़ त्या मी साडेतीन तासांत पूर्ण केल्याचे ते म्हणाले.
परभणी : अवघड स्पर्धा पार करून घालून दिला परिपाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:30 AM