लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या टंकलेखन शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षेत परभणी शहरातील केंद्रांवर गैरप्रकारांनी कळस गाठला असून, प्रवेशपत्रावर नाव एकाचे आणि परीक्षा देणारा दुसराच व्यक्ती असल्याची तक्रार उमेदवारांनीच केली आहे़महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने परभणी शहरातील १० केंद्रांवर सध्या टंकलेखनची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येत आहे़ ४ फेब्रुवारीपासून या परीक्षांना प्रारंभ झाला आहे़ त्यामध्ये १० केंद्रांवर ७ हजार ६८७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत़ यासाठी प्रत्येक केंद्रांवर एक बैठे पथक आणि १० भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले़ प्रशासकीय पातळीवरून या परीक्षेबाबत सर्व काही अलबेल असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र परीक्षेमध्ये अनियमिततेचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्याची तक्रार दोन उमेदवारांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयात दिली़या उमेदवारांच्या म्हणण्यानुसार परीक्षेत उत्तीर्ण करून देण्याची खात्री काही टंकलेखन संस्था चालकांनी घेतली असून, चांगल्या गुणाने पास होऊ इच्छिणाºयांना कोरे पेपर सोडवून देण्यास सांगितले जाते़ त्यानंतर काही एक्सपर्ट व्यक्तींकडून सदरील पेपर सोडून घेतले जातात़ तर काही परीक्षार्थ्यांच्या नावावर दुसरेच व्यक्ती परीक्षा देत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे़ या अनुषंगाने मंगळवारी सकाळी शहरातील रहेमतनगर भागातील फातेमा उर्दू शाळेवर या गैरप्रकाराविरोधात काही उमेदवारांनी पथकातील कर्मचाºयांकडे तक्रारी केल्या; परंतु, त्यांना दाद दिली गेली नाही़ त्यानंतर हे उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकाºयांना भेटले़ तेथे त्यांना सदरील विभाग आमच्याकडे येत नाही़ त्यामुळे शिक्षण विभागाकडे जा, असा अजब सल्ला या विभागातील अधिकाºयांनी दिला़ त्यानंतर या उमेदवारांनी ‘लोकमत’ कार्यालय गाठले़या परीक्षेत मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप या युवकांनी केला आहे़ या संदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनाही कल्पना देण्यात आली; परंतु, कारवाईच्या अनुषंगाने या विभागाकडून काय पावले उचलली गेली, याची माहिती उशिरापर्यंत उपलब्ध होवू शकली नाही़
परभणी: टायपिंगच्या परीक्षेत गैरप्रकाराचा कळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 12:20 AM