लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार मंगळवारी सायंकाळी ६ वाजता संपल्यानंतर पुढील ३७ तास उमेदवारांचा छुप्या पद्धतीने प्रचार करण्यावर भर राहणार आहे़परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एकूण १७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत़ या उमेदवारांनी २९ मार्चपासून जाहीर प्रचारास प्रत्यक्षरित्या सुरुवात केली़ १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जाहीर प्रचार संपला़ आता छुप्या पद्धतीने उमेदवारांकडून प्रचार होण्याची शक्यता आहे़ प्रचाराच्या १९ दिवसांच्या कालावधीत शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव, राष्ट्रवादी-काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांच्यासह अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध मान्यवरांनी जाहीर सभा घेतल्या़ या सभांमधून विविध विषयांवर मते मांडण्यात आली. तसेच प्रखर टीकाही करण्यात आली़ त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत भरली होती़ यावेळेसच्या निवडणुकीत जाहीर प्रचाराबरोबरच सोशल मीडियातूनही प्रचारावर भर देण्यात आला़ आता हा सर्व प्रचार थांबला असून, छुप्या प्रचाराला सुरुवात झाली आहे़प्रशासन मतदानासाठी सज्ज४जाहीर प्रचार संपल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली़ प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली असून, आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पथकांना सूचना दिल्या असल्याचे पी़ शिव शंकर यांनी सांगितले़४परभणी मतदारसंघात एकूण १९ लाख ८३ हजार ९०२ मतदार आहेत़ ६ विधानसभा मतदारसंघात २ हजार १७४ मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार असून, मतदानासाठी १० हजार ७०५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़मतदान काळात अधिकारी आणि मतदान यंत्रांची ने-आण करण्यासाठी ७३७ वाहने तयार ठेवली असून, या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली़ या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांची उपस्थिती होती़मतदारसंघातदारूविक्री बंदलोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपल्यानंतर ही निवडणूक सुरळीत व शांत वातावरणात पार पाडण्याच्या अनुषंगाने मतदार संघातील दारू विक्री बंद राहणार आहे़ १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता मतदार संघातील सर्व देशी, विदेशी दारुची दुकाने व परमीट रुम बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले़ त्यानुसार ही दारू विक्री दुकाने बंद झाली़ दारू विक्री बंदीचा आदेश १८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत़ या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत़पोलिसांचा तगडा बंदोबस्तमतदानाच्या दिवशी तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे़ ११ उपविभागीय पोलीस अधिकारी, १७ पोलीस निरीक्षक, १०४ सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, १८८० पोलीस कर्मचारी, ७८४ होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या दोन कंपनी, सीआरपीएफ ३ कंपनी बंदोबस्तासाठी तैनात केल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली़ तसेच कृषी विद्यापीठातील स्ट्राँग रुम परिसरातही आवश्यक तो बंदोबस्त नियुक्त केल्याचे त्यांनी सांगितले़२३ मे रोजी मतमोजणी४परभणी मतदार संघात २३ मे रोजी सकाळी ८ वाजता येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे़ याच ठिकाणी मतदान यंत्र ठेवण्यासाठी स्ट्राँग रुम उभारण्यात आली असून, पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे़
परभणी : उमेदवारांच्या जाहीर प्रचाराला पूर्णविराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:22 PM