लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: बद्रीनाथहून केदारनाथकडे जात असताना मुसळधार पावसात अडकलेल्या ४४ भाविकांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांच्या प्रयत्नांमुळे तत्काळ सैन्यदलाची मदत मिळाल्याने ते सुखरुप परभणीपर्यंत पोहचू शकले. रविवारी परभणीत भाविक दाखल झाले.परभणी येथील ४४ भाविकांचा जत्था १८ सप्टेंबर रोजी बद्रीनाथ व केदारनाथ येथे यात्रेसाठी गेला होता. पैठण येथील ह.भ.प. अंकुश महाराज पानखडे आणि परभणीतील नामदेव चुडावेकर यांच्यासह इतर भाविकांचा यात समावेश होता. २२ सप्टेंबर रोजी बद्रीनाथ येथील देवदर्शन करुन हे भाविक केदारनाथकडे निघाले होते. गौरीकुंड ते केदारनाथ हे १६ कि.मी.चे अंतर पार करुन काही जण पायथ्याकडे आले. मात्र अचानक हवामानात बदल झाला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसामुळे रस्ताही ठिकठिकाणी खचला. त्यामुळे भाविकांना काय करावे ते सुचत नव्हते. त्यानंतर आयोजक नामदेवराव चुडावेकर यांनी भ्रमणध्वनीवरुन परभणीतील काही जणांशी संपर्क साधला, मदतीची मागणी केली. याच दरम्यान पालम येथील एका कार्यकर्त्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांना ही माहिती दिली. त्यांनी तत्काळ सूत्रे हलविली.मुंबई, दिल्लीपर्यंतच्या मित्रांना माहिती दिली. उत्तर प्रदेश येथील ग्रामविकास मंत्री डॉ.महेंद्र सिंह, भाजपाचे केंद्रीय कार्यालय मंत्री श्याम जाजू, महाराष्टÑाच्या मुख्यमंत्री कार्यालयातील श्रीकांत भारतीय, मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांचे सहकार्य लाभले. त्यामुळे तत्काळ यंत्रणा कामाला लागली आणि सैन्य दलातील जवानांनी बद्रीनाथ येथील संकटात अडकलेल्या भाविकांना आरोग्य सेवा, निवारा आणि मदत करुन परतीच्या प्रवासासाठी सुखरुप रवाना केले.परभणीत पोहोचल्यानंतर अंकुश महाराज पानखडे, नामदेव चुडावेकर, अंकुश दुधाटे, माधव दुधे, दत्ता दुधे, राधा चुडावेकर, बाळासाहेब भोपाळे, विठ्ठल गिराम व इतर भाविकांनी अभय चाटे यांच्या घरी जाऊन कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कारही केला.
परभणी:मदतीमुळे सुखरुप पोहोचले यात्रेकरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:00 AM