परभणी : येथील बसस्थानक परिसरात मोठ मोठे खड्डे पडले आहेत़ या खड्ड्यात शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे़ याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे़ याकडे आगारप्रमुख व विभागीय नियंत्रक कार्यालयाचे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांची हेळसांड होत आहे़ प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़परभणी येथील बसस्थानक परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते़ संपूर्ण बसस्थानकाला तळ्याचे स्वरुप प्राप्त होते़ याशिवाय स्थानकावर ठिक ठिकाणी खड्डे पडले असून, ठिक ठिकाणी गिट्टी उघडी पडली आहे़ त्यामुळे प्रवाशांबरोबरच बसचालकांना तारेवरची कसरत करावी लागते़ त्यातच शनिवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे बसस्थानकात पाणी साचले होते़ त्यातच खड्ड्यातील पाण्यातून बसचालकांना बस काढावी लागत आहे़ त्याचबरोबर प्रवाशांना बस गाठायची असेल तर पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे़ बसस्थानकातील खड्डे बुजविण्यासाठी आतापर्यत हजारो रुपये खर्च करण्यात आले आहेत़ परंतु, खड्डे काही बुजविण्यात आले नाहीत़ त्यामुळे पावसाळ्यात या बसस्थानकात प्रवाशांची गैरसोय होत आहे़ १३ कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या बसपोर्टच्या कामाला गती देऊन प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे़
परभणी : बसस्थानकातील खड्डे बुजेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:53 PM