परभणी- मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, गुरुवारी परभणीत पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची चौकशी करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे़ या आंदोलनांतर्गत परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे जिंतूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलना दरम्यान झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याची घटना आज दुपारी १२ च्या सुमारास घडली़
परभणी जिल्ह्यात सकल मराठा समाजारच्या वतीने शनिवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे़ या आंदोलनांतर्गत परभणी तालुक्यातील जिंतूर रस्त्यावरील टाकळी कुंभकर्ण येथे सकाळपासून मराठा समाजातील युवकांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे़ येथे मोठ्या प्रमाणात युवक जमा झाले असून, युवकांनी रास्ता रोको सुरू केला़ यावेळी पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांवर दगडफेक सुरू करण्यात आली़ जमाव उग्र स्वरुप धारण करीत असल्याने दुपारी १२ च्या सुमारास जमावाला नियंत्रित पोलिसांनी हवेत दोन वेळा गोळीबार केला़ त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली़ येथे अद्यापही तणाव कायम असून, रस्त्यावरून आंदोलक हटलेले नाहीत़ पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे़
दरम्यान, जिल्हाभरात सकाळपासूनच चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले आहे़ परभणी शहरातील बाजारपेठ सकाळपासूनच बंद आहे़ शहरातील वसमत रस्त्यावर आऱ आऱ पेट्रोलपंप परिसरात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली़ काळी कमान येथेही दगडफेक झाली़ शहरातील खानापूर फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात येत आहे़ शहरातील जिंतूर महामार्ग, पाथरी राष्ट्रीय महामार्ग येथे रस्त्यावर टायर जाळून व लोकडे टाकून रस्ता रोखण्यात आला आहे़ परभणी तालुक्यातील असोला पाटी येथेही रस्ता रोको करण्यात आला़ मानवत, पाथरी, सेलू आदी तालुक्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे़ जिंतूर येथेही बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे़ तालुक्यातील आकोली रस्त्यावर आंदोलकांनी टायर जाळून राज्य सरकारचा निषेध केला़ जिल्ह्यातील प्रमुख तालुक्यांच्या ठिकाणच्या बाजारपेठा बंद आहेत.