लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील उड्डाणपुलाखाली एका पडक्या घरात लपून-छपून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १६ आरोपींना ताब्यात घेतले आहे.शहरातील उड्डाणपुलाच्या खाली मागील काही दिवसांपासून लपून-छपून जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या अधारे मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी या भागात दाखल झाले. तेव्हा या पडक्या घरात झन्ना- मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याचे दिसून आले. जुगार खेळणाºया २० ते २५ वर्षे वयोगटातील १६ युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौघे फरार झाले. या कारवाईत पोलिसांनी मोबाईल व रोख रक्कमेसह सुमारे ७५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह उपनिरीक्षक फोलाने, बालासाहेब डोंगरे, मधुकर चट्टे, मुकूंद कांदे, रामा पडघन, महंमद मोहसीन, रामा कदम, चालक उमर व मेटके यांनी ही कारवाई केली. दरम्यान, ही कारवाई सुरू असताना बघ्यांनी गर्दी केली होती. उड्डाणपुलावर बघ्यांची गर्दी झाल्याने काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.
परभणीत पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:10 AM