परभणी : जिल्ह्यात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादसह आगामी सण-उत्सव शांततेत साजरे होण्यासाठी विविध ठाण्याच्या हद्दीत पोलीस यंत्रणेकडून विविध आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत. यामध्ये संबंधिताविरुद्ध नोटीस जारी करणे, बंधपत्र, हमीपत्र भरून घेणे, याशिवाय त्यांना समज देण्याची कारवाई केली आहे. तसेच समाज विघातक कृती करणाऱ्या ११३ जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत थेट कारवाईचा बडगा पोलिसांनी उचलला आहे.
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात शांतता समितीच्या बैठका तसेच विविध तालुक्यांमध्ये पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संबंधित गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मागील एक महिन्यापासून याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. शनिवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर या सर्व कारवाई करून संबंधित इसमाविरुद्ध नोटीस जारी करणे, त्यांना सीआरपीसी कायद्याप्रमाणे कारवाईबाबत माहिती देणे, तसेच या गणेशोत्सव आणि सण उत्सवाच्या कालावधीत कुठल्याही प्रकारच्या गुन्हेगारी प्रकारापासून दूर राहण्याची समज देण्यात आली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी यंत्रणेने सर्वतोपरी तयारी केली आहे.
दोन हजार पोलिसांचा बंदोबस्तजिल्ह्यातील जवळपास दीडशेहून अधिक पोलीस अधिकारी, १८०० पोलीस अंमलदार, कर्मचारी यांचा बंदोबस्त गणेशोत्सवात राहणार आहे. साडेसातशे होमगार्ड यांची मदत सुद्धा पोलीस यंत्रणेला होणार आहे. याशिवाय दहा नवप्रविष्ठ पोलीस उपनिरीक्षक हे गणेशोत्सव कालावधीत विविध ठिकाणी कार्यरत राहतील. जिल्ह्यात एसआरपीची एक तुकडी अन्य ठिकाणाहून दाखल होणार आहे.
गणपती मंडळ दत्तक योजनाप्रत्येक गावात तसेच शहरांमध्ये विविध भागात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणेच्या अंतर्गत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून गणेश मंडळ स्थापन होणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पोलीस दलाच्या मार्फत गणेश मंडळ दत्तक योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात पाच गणपती मंडळामागे एक पोलीस अंमलदार तर दोन गणपती मंडळामागे एक होमगार्ड नियुक्त करून तेथील दहा दिवसाची गणेशोत्सव कालावधीतील विविध कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी यांच्याकडून सांभाळली जाणार आहे.