परभणी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलीस दलातील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने आज पहाटे शहरात तीन ठिकाणी छापे टाकून ७९ हजार रुपयांची अवैध देशी आणि विदेशी दारू पकडली आहे. एकूण १० आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात अवैध दारू विक्रीतून कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी जिल्ह्यात धाडसत्र सुरू केले आहे. श्री गणरायाच्या आगमनाच्या दिवशीच पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. १३ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजेपासून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे आणि त्यांच्या पथकाने शहरात तीन ठिकाणी छापे मारले. पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.
शहरातील मराठवाडा प्लॉट, उस्मानिया कॉलनी,वांगी रोड वरील हडको परिसर आदी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. मराठवाडा प्लॉट भागात देशी दारू पकडण्यात आली असून, उस्मानिया कॉलनी परिसरात विदेशी दारू आणि हडको परिसरात बिअरची अवैध विक्री होत असताना कारवाई करण्यात आली. या तीनही छाप्यांमध्ये देशी दारूच्या ९५८ बाटल्या, विदेशी दारूच्या ६५ बाटल्या आणि बिअरच्या ४८ बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. विशेष म्हणजे या कारवाईत १० आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यात तीन महिलांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. या धाडसत्रामुळे परभणी शहरात अवैध देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.