लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील रेल्वेस्थानकावर चालत्या रेल्वेतून उतरताना तोल जाऊन पडलेल्या जिंतूर येथील दांपत्याचे प्राण रेल्वे पोलिसांनी वाचविल्याची घटना २९ जानेवारी रोजी घडली.याबाबत रेल्वे पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २९ जानेवारी रोजी सकाळी ११२०१ ही लोकमान्य टिळक टर्मिनस- अजनी एक्सप्रेस रेल्वे परभणी रेल्वेस्थानकावरून सुटत असताना जिंतूर येथील निवृत्ती कांबळे (७०) व यमुनाबाई कांबळे हे दांपत्य घाईत रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करीत होते. यातच त्यांचा तोल जाऊन ते प्लॅटफॉर्मवर पडले व घरंगळत रेल्वेखाली जाणार त्याच क्षणी तेथे कर्तव्यावर उपस्थित असलेले रेल्वेचे पोलीस निरीक्षक मुकेशकुमार उमर यांनी तत्काळ या दांपत्याला बाजूला ओढून घेतले.त्यामुळे पुढील अनर्थ टळला. रेल्वे निघून गेल्यानंतर घाबरून गेलेल्या या दांपत्याला पोलिसांनी व नागरिकांनी धीर दिला. तसेच पो.नि. उमर यांचेही कौतूक करण्यात आले. याबाबतची माहिती अप्पर रेल्वे व्यवस्थापक विश्वनाथ इरिया यांना मिळाल्यानंतर त्यांनी मुकेश कुमार यांचे कौतूक केले व त्यांना पारितोषिक जाहीर केले. पोलीस निरीक्षक मुकेश कुमार यांच्या धाडसी कर्तृत्वाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.
परभणी : पोलिसांनी वाचविले जोडप्याचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 12:53 AM