परभणी - महाराष्ट्र दिनी गंगाखेड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून तालुक्यातील खादगाव येथील डोंगरावर दिडशे फुट समतलचर खोदुन महाराष्ट्र दिन साजरा केला.नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीवी प्रसाद यांच्या संकल्पनेतुन दि. १मे मंगळवार रोजी सकाळी महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण करून गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खादगाव येथे डोंगरावर पोलीस निरीक्षक सोहन माछरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेशराव थोरात, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब मगरे, राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस उपनिरीक्षक अहिरे, जमादार दिपक भारती, उमाकांत जामकर, सुलक्षण शिंदे, माणिक वाघ, राहुल गोला, गणेश वाघ, श्रीकृष्णा तंबुर आदी पोलीस अधिकारी, कर्मचारी व राज्य राखीव पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांसह खादगाव ग्रामपंचायतचे सदस्य तसेच तंटामुक्ती अध्यक्ष भागीरथ फड व ग्रामस्थांनी श्रमदान करून डोंगरावर १५० फूट लांब, २ फूट रुंद आणि २फूट खोल अशा आकाराचा "समतलचर" तयार केला. यामुळे पावसाळ्यात पाणी साठवुन वृक्षारोपण करण्यास मदत होणार आहे. गंगाखेड पोलीस ठाण्यातील अधिकारी व असंख्य पोलीस कर्मचारी गावात श्रमदान करण्यासाठी आल्याचे पाहुन ग्रामस्थांनी उत्सफुर्तपणे श्रमदानात सहभाग नोंदविला.
परभणीत पोलीसांचे महाश्रमदान; डोंगरावर खोदला दिडशे फुट समतलचर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 7:19 PM