लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २० वर्षांपूर्वी दरोड्यामध्ये चोरीला गेलेल्या अंदाजे एक किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू संबंधित व्यक्तीला परत करण्याची कामगिरी नानलपेठ पोलिसांनी केली आहे़ जुन्या फाईली, रजिस्टर शोधून फिर्यादीचा शोध घेऊन त्याच्यापर्यंत या वस्तू पोहचविण्यात आल्या़शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनगरमध्ये १९९७ साली दरोड्याची घटना घडली होती़ यावेळी चोरट्यांनी घरातील चांदीच्या वस्तू चोरून नेल्या होत्या़ या प्रकरणात नानलपेठ पोलीस ठाण्यातील तत्कालीन अधिकाºयांनी तपास केला़ आरोपींना अटक केली़ त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त केला़ विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपींची सुटकाही झाली़ परंतु, जप्त केलेला मुद्देमाल हा नानलपेठ पोलीस ठाण्यातच सुरक्षित ठेवण्यात आला होता़ २० वर्षांपासून पोलीस ठाण्यात ठेवलेला मुद्देमाल प्रत्येक वर्षी तपासणीमध्ये घेतला जात असे आणि तो परत ठाण्यातच राहत होता़ काही कागदपत्रे सापडत नसल्याने मुद्देमाल परत करताना अडचणी निर्माण होत होत्या़नानलपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव गाडेकर यांनी हा मुद्देमाल संबंधित फिर्यादीला परत करण्याचा निर्णय घेतला़ मात्र चोरीची घटना खूप जुनी असल्याने मुद्देमालाच्या संदर्भातील कागदपत्रे सापडत नव्हती़ या कामी ईश्वर ठाकूर, जमादार गुलाबराव घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे, पोलीस उपनिरीक्षक लोखंडे, अशोक सोडगीर यांनी प्रयत्न केले़ जुने दस्तऐवज शोधून काढले़ त्यात आरोपीला पकडल्याची नोंद असलेल्या एका जीर्ण झालेल्या कागदावर या प्रकरणातील फिर्यादीचे नाव सापडले़त्यावरून फिर्यादी अनंतराव वसंतराव वसेकर यांचा शोध घेण्यात आला़ त्यानंतर मुद्देमाल परत करण्यासाठी न्यायालयीन आदेशाचीही आवश्यकता असते़ परंतु, ही आदेशाची प्रत मिळत नसल्याने न्यायालयात प्रकरण दाखल करून न्यायालयाचा आदेश घेऊन १० जानेवारी रोजी अनंतराव वसंतराव वसेकर यांना हा मुद्देमाल परत करण्यात आला़यावेळी पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक लोखंडे, सहायक पोलीस निरीक्षक पुंगळे आदींसह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते़असा आहे मुद्देमाल१९९७ मध्ये पडलेल्या दरोड्यात चोरीला गेलेला चांदीचा तांब्या, सहा वाट्या, संध्यापात्र, ६ ग्लास व इतर चांदीच्या वस्तू पोलिसांनी परत केल्या आहेत़
२० वर्षांपूर्वीचा मुद्देमाल परभणी पोलिसांनी केला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 1:01 AM