लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदीपात्रात १५ दलघमी पाणी सोडण्यास परतूर, मंठ्याच्या नेते मंडळींकडून विरोध केला जात असून, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सहानुभूतीची भूमिका दाखविण्याऐवजी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले जात असल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे़ शिवाय पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी या संदर्भात घेतलेल्या भूमिकेविषयी देखील नाराजी व्यक्त केली जात आहे़परभणी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ गोदावरी, दुधना, करपरा, पूर्णा आदी नद्यांचे पात्र कोरडे पडले आहेत़ त्यामुळे एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ तर दुसरीकडे मुक्या जनावरांनाही पाणी आणि चाऱ्यासाठी रानोमाळ फिरावे लागत आहे़ या अनुषंगाने काही प्रमाणात जिल्हावासियांना निम्न दूधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडल्यास दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, या पाण्यावरूनही राजकारण सुरू झाले आहे़ दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडल्यास त्याचा सेलू, मानवत, जिंतूर व परभणी तालुक्यातील काही गावांना लाभ होऊन सदरील नदीकाठावरील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो़ शिवाय जनावरांच्या चाºया आणि त्यांच्या पाण्याचाही प्रश्न काही अंशी मार्गी लागू शकतो़ या अनुषंगाने परभणीचे आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती़ तसेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही यासाठी पुढाकार घेतला होता़ त्यानुसार १५ मेपर्यंत पाणी सोडले जाईल, असे रावते यांनी सांगितले होते; परंतु, गेल्या काही दिवसांपासून परतूर व मंठा भागात दुधनातून पाणी सोडण्यास विरोध केला जात आहे़ गेल्या आठवड्यातच धरणाच्या पायथ्याशी आंदोलन करणाºया आंदोलकांना मार्गदर्शन करताना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी नदीपात्रात पाणी सोडण्यास विरोध केला होता व टँकरने पाणीपुरवठा करण्यास हरकत नाही, असे सांगितले होते़ लोणीकर हे परभणीचे संपर्क मंत्री असतानाही त्यांनी या दृष्टीकोनातून व्यापक भूमिका न घेता संकुचित भूमिका घेतल्याबद्दल जिल्हावासियांमधून संताप व्यक्त होत आहे़ निम्न दुधनाच्या बॅकवॉटरमध्ये मोठ्या प्रमाणात मोटारीद्वारे शेतीसाठी अनधिकृतपणे पाणी उपसा केला जात आहे़ या मोटारी काढू देणार नाही, असा पवित्राही लोणीकर यांनी घेतला आहे़ त्यामुळे अनाधिकृत बाबींचे लोणीकर कसे काय समर्थन करू शकतात, असा सवाल उपस्थित होत आहे़जिल्ह्यातील राजकीय पक्षांची चुप्पी का?४दुधना नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे़ सेलू तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले़ जि़प़ सभापती अशोक काकडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतला़४या व्यतिरिक्त सक्रिय सहभाग इतर नेत्यांकडून घेतला जात नसल्याचे दिसून येत आहे़ याउलट परतूरमध्ये काँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आदी पक्षांच्या नेत्यांकडून पाणी सोडण्यास विरोध केला जात आहे़ त्यामुळे परभणीतील राजकीय पक्ष या संदर्भात चुप्पी साधून का आहेत? ते आपली भूमिका का स्पष्ट करीत नाहीत? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ ं
परभणी : निम्न दुधनाच्या पाण्यावरून राजकारण सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:41 AM