लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : शहरातून जाणाऱ्या पालम ते गंगाखेड या राष्ट्रीय रस्त्यावर मरडसगाव पुलावर दोन्ही बाजुने मोठ मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे जीवघेणे बनले असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डे बुजविण्याकडे संबंधित गुत्तेदाराकडून मात्र दुर्लक्ष केले जात आहे.पालम ते गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे यंत्रणेकडून रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरु आहे. पालम शहरानजीक दोन्ही बाजुंनी रस्त्यांचे हॉटमिक्स करण्यात आल्याने काही प्रमाणात प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे.मात्र केरवाडीपासून पुढे अनेक ठिकाणचे खड्डे ‘जैसे थे’ आहेत. याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. मरडसगाव पुलाच्या दोन्ही बाजुने रस्ता पूर्णत: खचला गेला आहे. जागोजागी खड्डे झाल्याने वाहनचालकांना वाहन चालविणे मुश्कील झाले आहे. इतर ठिकाणी रस्ता चांगला असला तरीही पुलावर मात्र मोठ मोठे खड्डे आहेत. हे खड्डे बुजविणे गरजेचे आहे. मात्र संबंधित गुत्तेदाराकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
परभणी : पुलावरचे खड्डे बनले धोक्याचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 1:00 AM