परभणी : भीमा कोरेगाव प्रकरणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनानुसार परभणी जिल्ह्यातील विविध भागांत बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. बंद दरम्यान परभणीत दगडफेक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात पेट्रोलची पेटती बाटली टाकल्याची घटना घडली.भीमा कोरेगाव घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी ३ जानेवारी रोजी भारिपने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच बाजारपेठेतील दुकाने बंद असल्याने शहरात शुकशुकाट होता. दरम्यान, सकाळी ११ वाजेच्या सुमारास जमाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन तास या ठिकाणी संतप्त जमावाने घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. शहरातील रस्त्या रस्त्यावर युवक घोळक्याने फिरत होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने पोलीस प्रशासनाने या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावला होता. याच दरम्यान, काही युवकांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून जमाव पांगविला. तेव्हा रेल्वे स्टेशन समोर अचानक दगडफेकीला सुरुवात झाल्याने एकच धावपळ उडाली. पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. यानंतर काही युवकांनी मनपा समोरील अॅड.अशोक सोनी यांच्या घरावर दगडफेक केल्याने काचा फुटल्या. विशेष म्हणजे सलग दुसºया दिवशी येथे दगडफेक झाली. त्यामुळे वातावरणात आणखीच तणाव निर्माण झाला होता.दुपारी दीड वाजेच्या सुमारास बसस्थानक ते रेल्वेस्टेशन मार्गावर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातील खिडकीतून पेट्रोलची पेटती बाटली आत फेकण्यात आली. त्यामुळे खोलीतील काही पुस्तके आणि साहित्य जळाले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्वयंसेवकांनी ही आग विझवून पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याच वेळी खानापूर फाटा येथेही जमावाने दगडफेक केल्यानंतर दोन गटात मारहाण झाल्याची घटना घडली आहे.शहरामध्ये दगडफेकीच्या घटना होत असल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत शहरात तणावाचे वातावरण होते. रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. महामंडळाची बससेवाही दिवसभर बंद होती. जिल्ह्यात इतर तालुक्यांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.परभणीतील शाळा- महाविद्यालयांचा सुटीबंदच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील शाळा- महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. त्यामुळे बुधवारी सर्व शाळा, महाविद्यालय देखील बंद राहिले. शासकीय कार्यालयांवरही बंदचा परिणाम जाणवला. जिल्हा परिषदमध्ये दुपारी ४ वाजता फेरफटका मारला तेव्हा तुरळक कर्मचारीच कार्यालयात उपस्थित असल्याचे पहावयास मिळाले. प्रशासकीय इमारत परिसरातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाºयांनी दांडी मारल्याचे दिसून आले. विशेषत: बाहेरगावहून अप-डाऊन करणाºया कर्मचाºयांना बससेवा बंद असल्याने नोकरीच्या ठिकाणी उपस्थित राहता आले नाही.
परभणीत कडकडीत बंदने जनजीवन विस्कळीतलोकमत न्यूज नेटवर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 12:20 AM