लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मंगळवारी सायंकाळच्या सुमारास परभणी शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात मागील आठवड्यात सर्वदूर पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती.रविवारी रात्री पाथरी, गंगाखेड, सोनपेठ, मानवत या तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर मंगळवारी मात्र परभणी शहर परिसरातच पावसाचा जोर दिसून आला. सायंकाळी साधारणत: ७ वाजेच्या सुमारास १५ ते २० मिनिटे जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे बाजारपेठ भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते.दरम्यान, गंगाखेड शहरात मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. काही वेळाने पावसाचा जोर वाढत गेला. साधारणत: १० मिनिटे जोरदार पाऊस बसरला. सेलू तालुक्यात मध्यम स्वरुपाचा तर पूर्णा तालुक्यात सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास १० मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. इतर तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरवली.गंगाखेड : १९ मि.मी. पाऊसपरभणी : मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांतील पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली असून गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक १९ मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यात ४.१३, पालम ९, पाथरी ७ आणि मानवत तालुक्यात १.३३ असा जिल्हाभरात सरासरी ४.५६ मि.मी. पाऊस झाला आहे.विशेष म्हणजे गंगाखेड तालुक्यात रविवारी रात्रीही जोरदार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे अनेक घरात पाणी शिरुन नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस झाला आहे.पुढील पाच दिवस पावसाचेचपरभणी : पावसाळ्यातील अखेरच्या सत्रात जिल्ह्यात पाऊस होत असून येत्या पाच दिवसांत दमदार पाऊस होण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवेने वर्तविली आहे.जिल्ह्यात यावर्षी सुरुवातीला पावसाने चांगलाच ताण दिला. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मात्र पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाने पिकांना तारले असून, आता येत्या पाच दिवसांतही चांगला पाऊस होण्याचा अंदाज कृषी विद्यापीठाने वर्तविला आहे.२५ सप्टेंबर रोजी १३ मि.मी., २६ रोजी २८ मि.मी., २७ रोजी ३४ मि.मी., २८ रोजी ५ मि.मी. आणि २९ सप्टेंबर रोजी १६ मि.मी. पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कृषी विद्यापीठाच्या या अंदाजानुसार पाऊस झाल्यास प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.
परभणी : जिल्हाभरात दमदार पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:34 AM