लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): झटपट पैसा मिळत असल्याने दामदुप्पट दराने व्याज आकारणी करून व शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून लाखो रुपये लुबाडण्याचा व्यवसाय तालुक्यातील फायनान्स व खाजगी सावकारीतून होत असल्याचे पहावयास मिळत आहे.येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे ६ ते ८ पतसंस्था व फायनान्स अधिकृत आहेत. या संस्था १०० ते १५० च्या जवळपास असून त्या अनाधिकृत आहेत. जिंंतूर शहरात किमान ७५ ते १०० व्यक्ती खाजगी व सावकारीचा धंदा करतात. त्यांच्याकडे कोणताही परवाना नाही. त्यांचे व्याज दर दरमहा १० ते २० टक्के एवढे असते. शिवाय दररोजच्या वसुलीत खाडा पडल्यास मनाने व्याज आकारणी केली जाते.मोठ्या वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळण्यास वेळ लागत असल्याने छोटे व्यवसायिक, हॉटेल कामगार, भाजी विक्रेते, पानपट्टीधारक हे खाजगी सावकारीकडे वळले आहेत. यातून होणारी लूट त्यांनाही कळत नाही. उचलेल्या रकमेच्या काही टक्के रक्कम प्रोसिसिंग फीस, बॉन्ड व इतर कागदपत्रांसाठी खर्च करावी लागते. त्यातच रक्कम उचलताना एक आठवड्याची रक्कम कपात केली जाते. शिवाय काही रक्कम ठेव म्हणूनही ठेवली जाते. शेअर्सच्या नावाखाली ही लुबाडणूक सर्रास होत आहे. १० हजार रुपये उचलणाऱ्या व्यक्तीला दामदुप्पट रक्कम भरावी लागते. हा सर्व प्रकार सहकार खाते उघड्या डोळ्याने पाहत आहे. विशेष म्हणजे, खाजगी सावकारी करणारे सावकार रक्कम देण्याअगोदर संबंधित व्यक्तीची मालमत्ता गहाण खत करून घेतात. परिणामी कायद्याच्या चौकटीत अडकत असल्याने लाभार्थीही तक्रार देण्यास टाळाटाळ करतात. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही हा प्रकार सर्रास सुरू आहे. या ठिकाणी दिडी व दुपटीचे व्यवहार चालतात. ग्रामीण भागातील शेतकरी व शेजमजूर सावकार म्हणेल त्या कागदावर स्वाक्षरी करतो. परिणामी कर्जच फिटत नसल्याने या वर्गाला आपल्या मालमत्तेवर पाणी सोडावे लागते. मोठ्या बँका सामान्य माणसांना कर्ज देताना टाळाटाळ करतात. परिणामी हा वर्ग खाजगी सावकाराकडे वळत आहे. प्रशासन मात्र खाजगी सावकारांच्या आर्थिक लुबाडणुकीवर लक्ष ठेवण्यास तयार नाही.जिंतूर शहरात ५० ते ६० भिस्सी सध्या सुरू आहेत. या भिस्यांच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल होत आहे. या अनधिकृत सावकारीला सहकार विभागाचा छुपा पाठिंबा दिसत आहे.विशेष म्हणजे, मागील वर्षभरात भिशीच्या प्रकरणावरून अनेक गुन्हे जिंतूर पोलीस ठाण्यात दाखल झाले. काही व्यक्तींनी भिशीच्या रकमा जमा केल्या तर काही फरार झाले.परिणामी, अनेक छोटे-मोठे व्यापारी अडचणीत सापडले आहेत. यामध्ये मोठ्या व्यक्ती असल्याने सहकार प्रशासनही कारवाई करण्यास धजावत नाही.खाजगी सावकारीचे तीन ते चार प्रकरणे सुरू आहेत. अनेक जण तक्रारी करीत नाहीत. तक्रार आल्यास तात्काळ कार्यवाही केली जाते. पतसंस्था व फायनान्सचे व्यवहार लवकरच तपासण्यात येतील.-ए.ए. गुसिंगे, सहायक निबंधक जिंतूर
परभणी : खाजगी सावकारीचा धंदा फोफावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 1:22 AM