लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शहरात विविध भागात निर्माल्य संकलन केंद्र सुरु करुन महानगरपालिकेने सुमारे ४ क्विंटल निर्माल्य संकलित केले आहे. या निर्माल्याच्या माध्यमातून गांडूळ खताची निर्मिती केली जाणार आहे.गणेशोत्सव काळात १० दिवस श्री गणरायाची पूजा केली जाते. या पुजेसाठी हार, फुले, दुर्वा आदींचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांबरोबरच घरोघरी स्थापित केलेल्या गणेश मूर्र्तींसमोर जमा झालेले निर्माल्य विसर्जनाच्या दिवशी पाण्यात टाकले जाते किंवा रस्त्याच्या कडेला फेकून दिले जाते. त्यामुळे या निर्माल्याचे पावित्र्य राखले जात नाही.ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांच्या संकल्पनेतून गांडूळखत उत्पादित करण्याचा प्रकल्प गणेशोत्सवापूर्वी सुरु करण्यात आला. येथील गांधी पार्क भागात साडेतीन बाय ११ फूट लांब आणि साडेतीन फूट खोल खड्डा करुन त्यात गांडूळ खताची निर्मिती केली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत सार्वजनिक गणेश मंडळांनी या ठिकाणी दररोज निर्माल्य जमा केले. त्याच प्रमाणे विसर्जनाच्या दिवशी खंडोबा बाजार, देशमुख हॉटेल, वसमतरोडवरील काळी कमान, जिंतूररोडवरील गणपती चौक, दर्गारोड परिसरातील कृत्रिम रेतन केंद्र भागात निर्माल्य संकलन केंद्र सुरु केले होते. विसर्जनाच्या दिवशी या केंद्रामध्ये नागरिकांनी जमा झालेले निर्माल्य एकत्रित केले. या काळात जवळपास चार क्विंटल निर्माल्य जमा झाले आहे.शहरातील वसमतरोडवरील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात गणेश विसर्जनाची व्यवस्था महापालिकेने केली होती. या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलित करण्यात आले. या निर्माल्याचे वर्गीकरण करुन ते गांधी पार्क येथे जमा केले असून त्यातून आता गांडुळखताची निर्मिती केली जाणार आहे. याकामी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अलकेश देशमुख, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुºहा यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला. त्यामुळे निर्माल्यापासून आता खताची निर्मिती होणार आहे.टाकाऊ वस्तुंचा पूनर्रवापर४सहाय्यक आयुक्त अलकेश देशमुख आणि स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुºहा यांच्या पुढाकारातून गांधी पार्क भागात टाकाऊ वस्तुंचा पूनर्रवापर करण्यात आला. त्यात जुन्या फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये रोपांची लागवड करण्यात आली आहे. तसेच फायबर कुलरचे दोन भाग करुन ट्री गार्ड म्हणून वापर करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे उन्हाळ्यात अंबा, जांभूळ, करंजी आदी बियाणे जमा करुन ३०० रोपांची लागवड या परिसरात केली आहे.
परभणी : चार क्विंटल निर्माल्यातून होणार गांडूळ खताची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:54 PM