लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी येथील शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली़परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता़ त्यानंतर त्यांनी यासंदर्भात २६ जून रोजी विशेष उल्लेखाची सूचनाही मांडली होती़ त्यानंतर उस्मानाबादचे भाजपा आ़ सुजीतसिंग ठाकूर यांनीही या अनुषंगाने व वैद्यकीय प्रवेशाच्या प्रादेशिक आरक्षणाच्या अनुषंगाने मंगळवारी विधान परिषदेत प्रश्न केला होता़ यावर बोलताना वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन म्हणाले की, जिल्हा पातळीवर जेथे जिल्हा रुग्णालय आहे तेथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याची राज्य व केंद्र शासनाची भूमिका आहे़ केंद्र शासनाने देशात ७५ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार महाराष्ट्रासाठी ७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची राज्य शासनाने मागणी केली आहे़ त्यामध्ये मराठवाड्यातील परभणी व उस्मानाबादचा समावेश आहे़ तसा प्रस्ताव केंद्राकडे सादर केल्याचे महाजन यांनी सांगितले़ वैद्यकीय प्रवेशाच्या ७०:३० टक्के प्रादेशिक आरक्षणासंदर्भात बोलताना महाजन म्हणाले की, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय हे खरे आहे़ यासंदर्भात शासन गांभिर्याने विचार करीत आहे़ यावर्षी वैद्यकीय प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे़ त्यामुळे पुढील वर्षी या संदर्भातील निर्णय लागू करण्यापूर्वी येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेवून या संदर्भात निर्णय घेऊत व त्या माध्यमातून हा प्रश्न निकाली काढूत़ या संदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल आहे़ त्यामुळे याबाबत पडताळणी करून निर्णय घ्यावा लागणार आहे़ निश्चितच या प्रकरणात आपण मार्ग काढूत, असेही महाजन म्हणाले़
परभणी : वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव केंद्राकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 12:11 AM