लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: परभणी शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र सुरु करण्यास परवानगी द्यावी, या अनुषंगाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार असून या संदर्भात येत्या सोमवारी होणाऱ्या बैठकीमध्ये चर्चेअंती मंजुरी घेतली जाणार आहे.परभणी शहर महापालिकेच्या वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीची सभा २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. आरोग्य सभापती सचिन देशमुख यांच्या दालनात ही सभा होणार असून त्यात शहरातील आरोग्याच्या अनुषंगाने विविध विषयांना मंजुरीसाठी ठेवले जाणार आहे.या सभेच्या अनुषंगाने उपलब्ध झालेल्या माहितीनुसार परभणी शहरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांचा भार जिल्हा सामान्य रुग्णालयावर येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत असून यावर मात करण्यासाठी परभणी शहरातील ज्येष्ठ नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी स्वतंत्र नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र शहरात कार्यान्वित करण्याचा विचार महापालिकेने केला आहे. याच अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानातून ज्येष्ठ नागरिकांसाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे, असा ठराव घेतला जाणार असून आरोग्य समितीच्या बैठकीत या ठरावाला मंजुरी मिळाल्यानंतर तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.आरोग्य समितीच्या या बैठकीमध्ये एकूण १७ विषयांवर चर्चा केली जाणार आहे. त्यात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच शहर महानगरपालिकेसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारणीचा ठरावही या बैठकीत ठेवला जाणार आहे. शहरातील गर्भवती महिला व बालकांचे रक्त नमुने तपासणे व तपासणी सेवा अधिक चांगली करण्यासाठी शहरामध्ये स्वतंत्र प्रयोगशाळा असणे आवश्यक असल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानातून प्रयोगशाळेसाठीही मंजुरी घेण्याबाबतचा ठरावावर चर्चा होणार आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी आणि तत्कालीन आयुक्तांसमवेतही चर्चा झाली असून त्यावेळी स्वतंत्र प्रयोगशाळेचा मुद्दा समोर आला होता. शहरामध्ये स्वतंत्र प्रयोगशाळा उभारणीचा ठरावही शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.शहरातील आरोग्य सेवा अधिक गतीमान करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही पाऊले उचलली असून सोमवारी होणाºया बैठकीत या दोन्ही ठरावांबरोबरच इतर ठरावांना मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती मिळाली.मशिनरींच्या खरेदीवरही होणार चर्चा४महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासाठी सोनोग्राफी, एमआरआय, सिटी स्कॅन, एक्स-रे या आरोग्य तपासणीच्या संदर्भातील मशिनरी खरेदीचा प्रस्तावही समोर ठेवण्यात आला आहे. शहरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांचा भार वाढत चालला असून शहरांतर्गत महापालिकेच्या रुग्णालयात या मशिनरी उपलब्ध झाल्या तर रुग्णांची गैरसोय टळू शकते. याच अनुषंगाने खरेदीचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. त्यासाठी साधारणत: तीन कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.या विषयांवर होणार चर्चा४महापालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत एकूण १७ विषय चर्चेसाठी ठेवले जाणार असून त्यात स्वतंत्र नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासह नोंदणी व नुतनीकरणासाठी शुल्क वाढ करणे, स्वच्छता विभागामध्ये साहित्य खरेदी, स्वच्छता कामगारांसाठी ड्रेस खरेदी, बायोमेडिकल वेस्ट, नागरी हिवताप योजनेंतर्गत सुरु असलेल्या मलेरिया विभागातील रिक्त कर्मचाºयांची भरती, पशू गणना आदी मुद्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली.
परभणी : ज्येष्ठांसाठी आरोग्य केंद्राचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:43 AM