लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दैनंदिन आहार हा सकसपूर्ण असला तरच आरोग्य चांगले राहते़ त्यामुळे प्रत्येक महिलेने रोजच्या आहाराकडे आणि पर्यायाने आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांनी केले़येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित पोषण माह कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी राठोड बोलत होत्या़ जि़प़ उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांच्या हस्ते उद्घाटन झाले़ या प्रसंगी महिला व बालकल्याण सभापती राधाबाई सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, आहारतज्ज्ञ प्रा़डॉ़वर्षा झंवर यांची उपस्थिती होती़ महिला व बालविकास विभागाच्या वतीने सप्टेंबर महिन्यात पोषण माह कार्यक्रम राबविला जाणार आहे़ त्यात हात धुणे, स्वच्छता, पौष्टिक आहार, अॅनेमिया, अतिसार या बाबींवर लक्ष दिले जाणार आहे़ कुपोषित बालकांच्या घरी भेटी देणे, स्तनदा मातांना गृहभेटी, किशोरवयीन मुलींचे आरोग्य, बालकांचा आहार, कुपोषण कमी करण्यासाठी आरोग्य शिबीर आदी कार्यक्रम घेतले जाणार आहेत़ त्याचप्रमाणे समुदाय आधारित कार्यक्रम, परसबागांचे संवर्धन, परिसर स्वच्छता, शाळा आधारित कार्यक्रम, पालक मेळावे, माता बैठका, युवा सभा, पथनाट्य आदी कार्यक्रम होणार आहेत़ या प्रसंगी भावनाताई नखाते, प्रा़डॉ़वर्षा झंवर, विजय मुळीक, कैलास घोडके यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले़ कार्यक्रमास जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मुख्य सेविकास, बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी आदींची उपस्थिती होती़
परभणी : आहारातूनच आरोग्याची समृद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 11:23 PM