लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिजाऊ ज्ञानतीर्थच्या माध्यमातून शिक्षणाचा आधार मिळाल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या मुलीने दहावी परीक्षेमध्ये ९४ टक्के गुण घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.प्रांजली देसाई असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वी कर्ज आणि नापिकीला कंटाळून प्रांजलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. आत्हत्येपूर्वी पत्नीच्या नावे पत्र लिहून मुलीला खूप शिकव, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. मात्र वडिलांचे छत्र हरवल्याने शिक्षणाची आबाळ होऊ लागली. अशा परिस्थितीत प्रांजलीच्या आजोबांनी जिजाऊ ज्ञानतीर्थ गाठले. जिजाऊ ज्ञानतीर्थच्या ‘आधार शिक्षाचा’ या योजनेत प्रांजलीला प्रवेश देण्यात आला. तिला भावनिकदृष्ट्या स्थीर करण्याचा प्रयत्न केला. तिला वाटणारी असुरक्षितता दूर करुन शिक्षणासह संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे प्रांजलीनेही अभ्यासात गती मिळविली. मार्च २०१९ मध्ये झालेल्या दहावी परीक्षेत तिने ९४ टक्के गुण मिळविले असून वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आश्वासक पाऊल तिने टाकले आहे.दरम्यान, प्रांजलीसह प्रा.नितीन लोहट, बाळासाहेब मोरे, संतोष गोंडफळे आदींनी पूर्णा तालुक्यातील बरबडी येथे जावून प्रांजलीचा तिची आई व आजोबासमवेत सत्कार केला.
परभणी : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीने सिद्ध केली गुणवत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:35 PM